मतदारांनी स्वाभिमान जपावा : आमदार बच्चू कडू

राधाकृष्ण विखे पुत्रप्रेमापोटी भाजपात गेले

स्थानिक आमदारांना जनतेचे काहीएक देणेघेणे नाही. एक कारखाना आहेच, अजून एक कसा होईल, यासाठी त्यांचे काम चालू आहे. तर माजी आमदार मागील उसाची देणी देत नव्हते तेव्हा मलाच लक्ष घालावे लागले, नंतर शेतकऱ्यांचे पैसे मिळाले. मावळते कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखें यांना पक्षाने काहीच कमी केले नाही, परंतु फक्त पुत्रप्रेमापोटी ते भाजपात निघालेत, अशी सर्व मंडळी सत्ता मिळवण्यासाठी आणि त्यातून स्वार्थ साधण्यासाठी काम करीत आहे, असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी चौफेर टीका केली.

श्रीगोंदा – आजतागायत फक्त धर्म, जात आणि पैशाच्या बळावर निवडणूक जिंकल्या गेल्या आहेत. सार्वजनिक प्रश्न मागे तसेच सोडून नेत्यांच्या स्वहित जपण्याच्या प्रवृत्तीला मतदार देखील जबाबदार असून आता मतदारांनी स्वाभिमान जपावा, असे आवाहन प्रहर संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले. तालुक्‍यातील आढळगाव येथे आयोजित सभेत आ. कडू बोलत होते. यावेळी अजय बारस्कर, साहेबराव रासकर, विनोद परदेशी आदींची भाषणे झाली. वामन भदे, संतोष पवार, प्रकाश बेरड, अजित धस, विमल अनारसे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. कडू म्हणाले, देशात आणि राज्यात अनेकांनी सत्ता उपभोगली. मात्र महत्वाच्या सार्वजनिक प्रश्नांना नेहमीच बगल दिली गेली. राज्याच्या विधानसभेत 288 आमदार असताना एकही आमदार शेतकरी, दलित आणि अपंगांविषयी पोटतिडकीने प्रश्न मांडताना दिसले नाहीत.

राज्यात भीषण दुष्काळ पडला असताना भाजप सरकार दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी हजारो कोटी जाहीरातबाजीवर खर्च करीत आहे. हाच पैसा शेतकऱ्यांसाठी वापरला असता तर शेतकरी आत्महत्या कमी करण्यात नक्कीच यश आले असते. राज्यातील साखर सम्राटांविरोधात लढणाऱ्या राजू शेट्टी यांच्यावर कित्येक गुन्हे दाखल झाले, मात्र ते मागे हटले नाहीत. शेतकऱ्यांची चळवळ उभी करणाऱ्या शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले, असेच घडत राहिले तर हळूहळू चळवळ ही गोष्टच नामशेष होईल, अशी भीती आ. कडू यांनी व्यक्त केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)