“ईएसआयसी’च्या परीक्षेत उमेदवारांचा उडाला गोंधळ

राज्याबाहेरील केंद्रांमुळे परीक्षार्थी अडचणीत : 26 फेब्रुवारीला होणार परीक्षा

कोंढवा – कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) विभागाच्या वतीने विविध पदांसाठी येत्या 26 फेब्रुवारी रोजी परीक्षा होत आहे. मात्र, परीक्षेसाठी उमेदवारांना महाराष्टाबाहेरील परीक्षा केंद्र दिल्यामुळे परीक्षार्थींचा पुरता गोंधळ उडाला आहे. राज्याबाहेरील परीक्षा केंद्रावर कसे जायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच याबाबत ईएसआयसीकडून कोणतेही सहकार्य केले जात नाही, असे राज्याबाहेरील केंद्र मिळालेल्या परीक्षार्थींनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ईएसआयसीच्या डेंटल हायजिनिस्ट, ईसीजी टेक्‍निशियन, लॅब असिस्टंट, ओटी असिस्टंट, ऑक्‍युपेशनल थेरपिस्ट, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट आणि स्टाफ नर्स या पदांसाठी परीक्षा होत आहे. एकूण 159 पदांसाठी 26 फेब्रुवारी रोजी परीक्षा होत आहे. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. परीक्षेसाठी उमेदवारांना तीन केंद्र निवडीचे पर्याय दिले होते. त्यामध्ये महाराष्टातील उमेदवारांनी मुंबई, पुणे आणि नाशिक ही शहरे निवडली होती. परंतु, प्रवेशपत्र (हॉल तिकीट) मिळाल्यानंतर उमेदवारांना थेट राज्याबाहेरील परीक्षा केंद्र मिळाल्याचे निदर्शनास आले.

उमेदवारांना दिल्ली, नोयडा, लखनऊ, अशा केंद्रांची नावे प्रवेशपत्रावर देण्यात आली आहेत. आजपर्यंत अशा ठिकाणी गेलेलो नाही. तसेच या ठिकाणची काहीही माहिती नाही. त्यामुळे परीक्षेला कसे जायचे, अशी चिंता या उमेदवारांना सतावत आहे. तसेच दूरच्या ठिकाणी जाण्याचा खर्च परवडणारा नाही. रेल्वेने जायचे झाले, तर 40 तासांचा प्रवास आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेचे आरक्षण तीन-तीन महिने अगोदरच हाऊसफुल्ल झालेले असते. परीक्षार्थींसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष सवलत नाही, त्यामुळे अनेक उमेदवारांना परीक्षा देता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत ईएसआयसीच्या मुंबई कार्यालयाशी संपर्क साधला असता कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नाही.

उमेदवारांसमोर अनेक अडचणी

ग्रामीण भागातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इंटरनेटची सुविधा वेळेत मिळत नाही. त्यामुळे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत उमेदवारांनी परराज्यात परीक्षेला जाताना असंख्य अडणींचा सामना करावा लागणार आहे. रेल्वे अथवा खासगी बसची सुविधा असली तरी 40 तासांचा प्रवास करून जावे लागणार आहे. तसेच जेवणाची, राहण्याची सोय कुठे करायची, तो खर्च कसा करायचा, असे अनेक प्रश्‍न उमेदवारांना पडलेले आहेत.

 
पत्ता कुठे शोधणार?

प्रवेशपत्रावर दिलेल्या पत्त्याची ऑनलाइन तपासणी केली असता, मॅपवर कुठेच दिसत नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे परीक्षेला जायचे असेल, तर केंद्र कुठे शोधणार, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. खुल्या गटातील उमेदवारांकडून प्रतिअर्ज 500 रुपये घेण्यात आले आहेत. तर, मागासवर्गीय गटातील उमेदवारांकडून 250 रुपये शुल्क घेण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेसाठी दिलेले शुल्क वाया जाणार आहे. प्रशासनाने ज्यांना परीक्षेला बसता आले नाही, त्यांचे शुल्क परत द्यावे.तसेच ज्या परीक्षार्थींना राज्याबाहेरील केंद्र दिले आहे, त्यांना तातडीने मदत करून महाराष्टातील केंद्र उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.

 
ईएसआयसीच्या परीक्षा राज्य सरकार घेत आहे. त्यामुळे उमेदवारांना योग्य केंद्र देण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. ज्यांना राज्याबाहेरील केंद्र दिले आहे. तसेच, ज्या राज्यातील उमेदवार आहेत, त्यांना त्यांच्या जवळच्या केंद्रावर परीक्षेसाठी सोय करून दिली पाहिजे. ही राज्यसरकारची नैतिक जबाबदारी आहे. सर्वांना समान संधी या न्यायाने आपल्या राज्यातील मुलांना अग्रहक्क दिला पाहिजे.

– ऍड. व्ही. व्ही. बोरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)