उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बारी यांचा इशारा वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांवर यापुढे थेट गुन्हे
शिक्रापूर – पुणे- नगर महामार्गावर वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करीत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण तसेच रस्त्याच्याकडेला विविध वस्तू विक्री करणारे विक्रेते व वाहतुकीला अडथळा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांनी दिला.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनासाठी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी डॉ. बारी बोलत होते. याप्रसंगी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक निरीक्षक मयूर वैरागकर, नवनाथ रानगट, वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक रामदास शेळके, शिकारपूरचे माजी सरपंच रामराव सासवडे, सुरेश हरगुडे, कोरेगाव भीमाच्या सरपंच संगीता कांबळे, जितेंद्र गव्हाणे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष अशोक शहाणे, बाबा चव्हाण, मंगेश विरोळे, अशोक दरेकर, राहुल टाकळकर, संजय भांबुर्डेकर, संजय नरके, महेश शिर्के, कैलास काळकुटे, सुनील चौरसिया, जितेंद्र जोशी, किरण पुंडे यांसह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी वाहतूक कोंडीविषयी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. पुणे- नगर रस्त्यावरील दुभाजकांवर रात्रीच्या वेळेस दुभाजकाच अंदाज येण्यासाठी रिफ्लेक्टर बसविण्याचा तसेच कंपनीच्या वाहनांना तसेच एसटी चालकांना मुख्य चौकापासून पुढील अंतरावर थांबण्याच्या सूचना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. दरम्यान, या मार्गावर सातत्याने कोंडी होत असल्याने वाहनचालक पुरते वैतागले असून गेल्या अनेक दिवसांपासून या परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. शिवाय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनाही या प्रश्नी फारसा रस नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता उपविभागीय पोलीस आयुक्तांचा इशारा कितपत गांभीर्याने घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा परिसरातील रस्त्याच्याकडेला भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तसेच अतिक्रमणधारकांवर कारवाई करून गुन्हे दाखल करणार आहे. भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्याकडेला भाजीपाला विक्रीसाठी बसू नये तसेच रस्त्याच्याकडेला असलेले अतिक्रमण देखील व्यावसायिकांनी काढून घ्यावे; अन्यथा कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
– सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे.