आधुनिक मिडिया क्षेत्राला भरती येणार? (भाग-१)

प्रसार माध्यम व मनोरंजन क्षेत्राअंतर्गत एक क्षेत्र बनतं जे आता चांगल्या अशा परतफेडीच्या दृष्टीनं पाहण्यासाठी गुंतवणूकीसाठी पात्र ठरू शकेल. स्वाभाविकच, या क्षेत्रातील संभाव्य प्रगतीवर गुंतवणूक करण्याचा विचार होऊ शकतो.

हा वसंत रंग भरीत जगती येतसे पहा, बहरल्या दिशा दहा!

कोकीळा ही उपवनात ! अमृतमधुर गीत गात!

रम्य दिवस चांदरात, फिरत फिरत भृंग हा ॥ ‘

ऋतुराज म्हणजे वसंतऋतु ! कवी माधव जुलियन म्हणतात, ‘ नकोत मजला विविध सुरांचे कृत्रिम हे हिंडोळ, कोकिळे ऐकव तव मधुर बोल !’ आजकाल होळीच्या आधीच थंडी कोठेतरी लुप्त झालेली असते व होळी पासून वाढत चाललेल्या उष्म्यात, रखरखाटात झाडे, वेली, पशू, पक्षी त्रस्त होऊन गारव्यासाठी आसावलेले दिसतात. जमिनीवरची ओल सुकून गेलेली असते आणि दिवसभराच्या तापमानात चांगलाच बदल जाणवायला लागतो. पहाटे पहाटे पांघरूण ओढावेसे वाटायला लावणाऱ्या थंडीची कौतुकं बंद होण्याच्या मार्गावर असतात  आणि दुपारी आपसूकच मग पंखे, आता एसी ऑन व्हायला लागतात.

तपमापकाचे आकडे हळूहळू चढायला लागतात. अशा या वसंत ऋतूची चाहूल लागते ती म्हणजे मोहोरलेल्या आंब्याच्या देखाव्यानं आणि त्यातून स्वतःची ओळख लपवून कंठ काढणाऱ्या कोकीळमुळं. शिशिरात निष्पर्ण झालेल्या वृक्षांवर कोवळी कोवळी, तांबूस-पोपटी पालवी नजाकत आणत असते तर त्याजबरोबर विविध कुसुमांची देखील बहरण्यासाठी चढाओढ लागलेली दिसते. कुठेतरी सांगाड्या सारखे उभे असलेले पळस, पांगारा, सावरी आपल्या अंगावर लाल, गुलाबी, केशरी रंगाच्या फुलांची उधळण करत आपलं वेगळेपण जपत असतात तर शानदार गुलमोहोर उमलून आलेले केशरी तुरे घेऊन दिमाखात उभा असतो, त्यालाच जणू काही खिजवत बहावा आपला पीत डौल बाळगून हसतो. अशा रखरखीत दुपारी खरबूज-कलिंगडाची दुक्कल कोणास खुणावत नसेल तरच नवल. मग कललेल्या उन्हात तप्त मातीचा एक वेगळाच गंध संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणाशी हातमिळवणी करण्यास तत्पर वाटतो. त्यात आंबट-गोड अननस, व मधूर द्राक्षं यांजबरोबरीनं राजाच्या आगमनाआधी स्ट्रॉबेरी व लिची या भाव खाऊन जातात, तर संध्याकाळची वेळ मार्गी लावण्यासाठी कांही शौकीन मग मदिरेचा सहारा घेतात.

परंतु दुसरीकडं मार्च-एप्रिल महिना म्हटला की परिक्षांमुळं पाल्यांच्या काळजाचा ठोका चुकतो, त्याचबरोबर पालकांचा देखील आकांत चालू होतो. मार्च म्हटलं की चाकरमानांना वेध लागतात ते इन्शुरन्स पॉलीसीचे हफ्ते भरण्याचे किंवा कर वाचवण्यासाठी नव्या गुंतवणुकीचे. मार्च एंड म्हटलं की बँक कर्मचाऱ्यांच्या पोटात तर गोळाच येतो, ओव्हरटाईमचा डोस तर भोवळच आणतो. या काळात शरीरशक्ती क्षीण होते म्हणून सृष्टी आपला जीवनरस संत्री, द्राक्षं, कलिंगड, खरबूज, स्ट्रॉबेरी, लिची, अननस, आंबे, फणस, जांभूळ, जाम अशा  एक ना अनेक फळांद्वारे भरभरून देत असते. या काळात दिवसाचा, उन्हाचा, तप्ततेचा काळ मोठा व  शांततेची, थंडाव्याची रात्र लहान !

आधुनिक मिडिया क्षेत्राला भरती येणार? (भाग-२)

परंतु या वेळच्या उन्हाळ्यात एक आगळा फिवर आहे, एक वेगळीच लगबग आहे. या वेळचे मार्च, एप्रिल, मे महिने गाजणार ते एका वेगळ्या कारणानं, ते म्हणजे निवडणूका. या निवडणुकीच्या सीझनमध्ये उमेदवाराखेरीज प्रत्येकजण हा (वार्तालापात) चॅम्पियन असतो. मग पानाच्या टपरीपासून ते हाय क्लास लाऊंज पर्यंत आणि अमृततुल्यापासून ते थेट विविध टीव्ही चॅनल्स पर्यंत. जसजसा हा ज्वर वाढत जाईल व एक्झिट पोल्स आपले सूतोवाच करत सुटतील तसतसे रेग्युलरली आयपीएल वा विविध सिरियल्स पाहणारे-पाहणाऱ्यांना रात्रौच्या जेवणानंतर नक्कीच (दिवसातून) किमान दोन तास तरी इडियट बॉक्स समोर ठाण मांडून विविध न्यूज चॅनेल्स वरील चर्वण पाहल्याशिवाय खाल्लेलं पचनी पडणार नाही.. असो, सांगायचा मुद्दा हा आहे की, पुढील दोन महिने, म्हणजे मे शेवटापर्यंत न्यूज टीव्ही चॅनेल्स फुल्ल डिमांड मध्ये असणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)