चोरीच्या पैशांतून पत्नीसाठी पाच लाखांच्या दागिन्यांची खरेदी

नगरसेविकेच्या घरातून सव्वासात लाखांची रोकड चोरणारा अटकेत

पुणे – धनकवडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका अश्‍विनी भागवत यांच्या घरातून 7 लाख 25 हजारांची रोकड लांबवून पसार झालेल्या चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 4 लाख 99 हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. त्याने चोरलेल्या रकमेतून 4 लाख 99 हजाराचे दागिने पत्नीसाठी खरेदी केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजय रोहिदास फुंदे (32 रा. बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. भागवत यांच्या घरातून दि.18 जून रोजी 7 लाख 25 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. भागवत यांचे पती सागर भागवत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सागर यांच्या मित्राचा विवाह होता. त्याने सागर यांच्याकडे 7 लाख 25 हजारांची रोकड ठेवण्यास दिली होती. सागर यांनी ही रोकड कपाटात ठेवली होती. भागवत यांच्या मित्राने दि.18 जून रोजी रोकड परत करण्याबाबत विचारणा केली, तेव्हा सागर भागवत यांनी घरात असलेल्या मुलीला कपाटातून रोकड काढण्यास सांगितले.

मुलीने कपाट उघडले, तेव्हा रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. भागवत यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्हींद्वारे झालेले चित्रीकरण पोलिसांनी पडताळले, तेव्हा फुंदे हा भागवत यांच्या घराच्या परिसरात घुटमळत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी फुंदे याचा माग काढून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने भागवत यांच्या घरातून रोकड चोरल्याची कबुली दिली. फुंदे याने ही रोकड दागिने खरेदीसाठी खर्च केल्याचे उघडकीस आले. त्याने सराफी दुकानातून सोनसाखळी तसेच अन्य दागिने खरेदी केले होते.

फुंदे याने धनकवडी भागात घरफोडीचे आणखी काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन खामगळ आणि पथकाने ही कारवाई केली.

नगरसेविकेचे पत्र घेण्याच्या बहाण्याने चोरी
फुंदे हा नगरसेविका भागवत यांच्या घरी काही दिवसांपूर्वी पत्र घेण्याचा बहाणा करून आला होता. त्या वेळी त्याने घराची पाहणी केली. दि.18 जून रोजी भागवत कामानिमित्त बाहेर पडले. घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने दुमजली घरात मागील बाजूच्या जिन्याने प्रवेश केला आणि कपाटातील रोकड लांबविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)