पर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी

राज्य शासनाच्या निर्णयाला शिक्षकांचा विरोध

13 नोव्हेंबरला आझाद मैदानात आंदोलन


पुणे –
एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या ठिकाणच्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या निर्णयाविरुद्ध 13 नोव्हेंबरला आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार असल्याचे “खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघा’ने शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
या आदेशाचा सर्वाधिक फटका कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शिक्षकांना बसणार आहे. संबंधित जिल्ह्यात शिक्षकांच्या 10 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक जागा रिक्त असल्याने त्यांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.

परिणामी कोकणातील शिक्षकांवर ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ आली आहे, अशी नाराजी शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आंतरजिल्हा बदल्यांच्या तिसऱ्या टप्प्यात कोकणातील शिक्षकांचा त्वरित समावेश करावा, तसेच सर्व जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावी, अशी मागणी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने शनिवारी पुण्यात केली. या वेळी महासंघाचे उपाध्यक्ष संतोष चव्हाण आणि सरचिटणीस संतोष जगताप उपस्थित होते.

ग्रामविकास विभागाने गेल्या वर्षीपासून शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा तिसरा टप्पा 1 नोव्हेंबरपासून राबवण्यात येत आहे. या बदल्यांच्या पहिल्या टप्प्यात सर्व जिल्ह्यांतील शिक्षकांना समान संधी देण्यात आली. मात्र, दुसऱ्या प्रक्रियेत कोणतीही सूचना न देता कोकणातील काही जिल्ह्यांना आंतरजिल्हा बदल्यांच्या ऑनलाईन प्रक्रियेतून वगळण्यात आले. त्यामुळे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून कोकणातील दुर्गम भागांत कार्यरत शिक्षकांची बदलीची आशा मावळली असून, भ्रमनिरास झाला आहे.

आता तिसऱ्या टप्प्यातही 10 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रिक्त पदांच्या नावाखाली कोकणातील शिक्षकांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठता असतानाही अनेक दिव्यांग शिक्षक, विधवा, घटस्फोटिता, दुर्धर आजाराने ग्रस्त शिक्षक, पती-पत्नी एकत्रीकरणाच्या प्रतिक्षेतील शिक्षकांवर दुर्गम भागातच राहण्याची वेळ आली आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 13 नोव्हेंबरला आझाद मैदानात हे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे महासंघातर्फे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)