पुणे – गुन्हे शाखा युनिट-4च्या पथकाने एका सराईत घरफोड्यास अटक केली. तो अल्पवयीन असल्यापासून घरफोडी करत आहे. विशेष म्हणजे, तो चोरीचा सर्व माल आई-वडिलांना देत असे. त्याचे आई-वडील सध्या घरफोडीच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत आहेत. रोहीत नानासाहेब लंके (20, रा.कस्तुरबा वसाहत, विश्रांतवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
रोहीत हा घरफोडीसाठी आधी दुचाकीची चोरी करत असे. त्यावरुन तो घरफोडीसाठी जात असे. विशेष म्हणजे त्याच्या आई-वडिलांवरही घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. रोहितला गर्दची नशा असून तो नशा करुनच घरफोडीसाठी जात असे. पोलिसांनी अनेकदा त्याचे समुपदेशनही केले होते. मात्र, त्याच्या वर्तवणुकीत कोणताच फरक पडला नाही.
दरम्यान, युनिट-4चे पथक सराईतांचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक व पोलीस हवालदार राजु मचे यांना रोहीत लंकेने पाच दिवसांपूर्वीच सुरेखा कम्युनिकेशन येथून दुचाकी चोरुन औंध येथे घरफोडी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला विश्रांतवाडी परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याने केलेल्या गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना सापडले आहेत. चतु:शृंगी पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीतील 120 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच दुचाकी असा 3 लाख 25 हजारांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश महाडिक, पोलीस कर्मचारी राजू मंचे, शंकर पाटील, गणेश साळुंके, दत्तात्रय फुलसुंदर, गणेश काळे, विशाल शिर्के व राकेश खुनवे यांच्या पथकाने केली.