भोर शहरात अतिक्रमणांवर फिरवणार बुलडोझर

दुसऱ्यांदा ठोस कारवाईचा उगारला बडगा : अतिक्रमणधारकांना भरली धडकी

भोर – भोर शहरात दिवसेंदिवस शहरातील मोक्‍याच्या ठिकाणी अतिक्रमणे वाढत असून वाहतूक कोंडीचा प्रश्‍न रोजच्या रोज वाढत आहे. भोर नगरपालिका प्रशासनाने अशा अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या (गुरुवारी) ही कारवाई होणार असून त्यासाठी भोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू मोरे यांच्याकडे याकामी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पत्राद्वारे भोर नगर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी पोलिसांचा फौजफाटा मागवला आहे. पुणे येथूनही पोलिसांची विशेष कुमक मागवली असल्याचे कळते. या धडक कारवाईच्या अनुषंगाने भोर नगरपालिका प्रशासनाने याची माहिती भोरचे उप विभागीय अधिकारी, तसेच तहसीलदार यांना या पत्राच्या प्रती देऊन माहिती दिली आहे. भोर शहरात भोर नगरपालिका प्रशासनाने जानेवारी महिन्यात याच मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई केली होती; मात्र आठ दिवसांच्या आत पुन्हा “जैसे थे’ परिस्थिती समोर आली. त्यामुळे भोर नगर पालिकेची ही अतिक्रमण कारवाई एक फार्सच ठरली होती. या विषयी तसी नागरिकांत चर्चाही रंगली होती.

भोर शहरात एसटी बसस्थानक ते मंगळवार पेठ आणि राजवाडा चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर पाच-पाच मिनिटांना वाहतूक कोंडी होत असून, रस्त्याने साधे चालणेही अवघड होत आहे. याकडे पोलिसांसह नगर पालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष होत होते; मात्र हा विषय गांभीर्याने घेत भोर नगर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी घेतली असून अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

भोर शहरात कायमच वाहतुकीची कोंडी होत असून, भोर चौपाटी (शेटेवाडी) परिसर, भोर नगर पालिका चौक ते भोरची बाजारपेठ असलेल्या मंगळवार पेठेतील दुकानदारांनी पदपथापर्यंत वाढवलेली दुकाने, दुकानांसमोर ग्राहकांनी वाहतूक कोंडीची पर्वा न करता पार्क केलेली वाहने, बसस्थानक ते सुभाष चौकापर्यंतच्या रस्त्याचे दुतर्फा पदपथावर फळ विक्रेते, मासळी विक्रेते आणि भाजीपाला विक्री करणारे लोक यांच्या मनमानीमुळे रस्त्याने चालणेही अवघड होत आहे. हिच स्थिती सुभाष चौक ते राजवाडा चौक आणि तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयापर्यंतची असून, या साऱ्यामुळे भोर शहरात वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा मनस्ताप हा विषय नित्याचाच होऊन बसला आहे; मात्र यांचे गांभीर्य कोणत्याच प्रशासनाला नसून याकडे पोलीस ही काणाडोळा करत असतात. या विषयाचे अनुषंगाने शहरातील सूज्ञ नागरिकांनी भोर नगरपालिका आणि पोलिसांना निवेदनेही देऊन लक्ष वेधले होते.

येथील अतिक्रमणे हटविणार
शहरातील चौपाटी येथील छत्रपती शिवाजी पुतळा ते नगर पालिका कार्यालय, भोर नगर पालिकेच्या मालकीच्या बागेच्या भोवतालची अतिक्रमणे, राजवाडा परिसर, नगरपालिका ते सुभाष चौक मार्गे एसटी स्टॅंड, सुभाष चौक ते राजवाडा रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहे.

कॉंग्रेसची एकहाती सत्ता तरीही…
भोर नगर पालिकेवर कॉंग्रेसची एक हाती सत्ता असतानाही या गंभीर विषयाबाबत ना नगराध्यक्ष ना उपनगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी नगरसेवक “ब्र’ काढत नसल्याने भोर शहरातील वाहतूक कोंडीचे भिजत घोंगडे आहे. असे असताना मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी घेतलेल्या निर्णयाचे भोर शहरातील नागरीक स्वागत करत असून अतिक्रमण करणारांना मात्र धडकी भरली असल्यास नवल वाटायला नको!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)