सीमाभिंत दुर्घटनाप्रकरणी बिल्डर, आर्किटेक्‍ट अखेर काळ्या यादीत

महापालिका आयुक्‍तांनी दिली मान्यता

पुणे – कोंढवा आणि आंबेगाव सीमाभिंत दुर्घटनाप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत या दोन्ही ठिकाणचे विकसक, स्ट्रक्‍चरल डिझायनर, लेबर कॉन्ट्रक्‍टर यांना ब्लॅकलिस्ट करण्यास महापालिका आयुक्‍त सौरभ राव यांनी मंगळवारी मान्यता दिली. त्यामुळे या व्यावसायिकांचे मंजुरीच्या प्रक्रियेत असलेले सर्व प्रकल्प बांधकाम विभागाकडून रद्द केले जाणार आहेत. मागील आठवड्यात कोंढवा आणि आंबेगाव येथे सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला होता.

दोन्ही दुर्घटनांच्या “सीओईपी’ने केलेल्या चौकशीत दोन्ही भिंतीच्या बांधकामावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे बांधकाम विभागाकडून या दोन्ही ठिकाणचे विकसक, बांधकाम व्यावसायिकांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव आयुक्‍तांच्या मान्यतेसाठी ठेवला होता. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील “स्टायलस ऍल्कॉन’ इमारतीच्या सीमाभिंत दुर्घटनेला जबाबदार धरून विकसक जगदीश अगरवाल यांच्यासह संचालक विवेक अगरवाल, विपुल अगरवाल, स्ट्रक्‍चरल इंजिनिअर, आर्कीटेक्‍ट सुनील हिंगमिरे, स्ट्रक्‍चरल इंजिनिअर अकील शेख यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. याशिवाय लगतच्या कुणाल बिल्डर्सचे हेमेंद्र शहा, पंकज व्होरा आणि गांधी यांच्यासह आर्कीटेक्‍ट, लेबर कॉन्ट्रॅक्‍टर, डिझाईन इंजिनिअर यांनी विहीत मुदतीत स्पष्टीकरण दिले नसल्याने या सर्वांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. तर सिंहगड कॉलेज सीमाभिंत दुर्घटनाप्रकरणी लगतच्या बांधकाम साईटचे विकसक संतोष ऊर्फ बाळासाहेब दांगट यांना नोटीस देण्यात आली होती. परंतु, त्यांनीही अद्याप खुलासा न केल्याने दांगट यांनाही ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे.

सर्व मान्यतेचे प्रस्ताव थांबणार
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काळ्या यादीत टाकण्यात आलेले बांधकाम व्यावसायिक तसेच आर्किटेक्‍चरला कोणतेही नवीन प्रस्ताव दाखल करता येणार नाहीत. तर यांनी प्रस्ताव दाखल केले असतील मात्र, ते मंजूर झालेले नसतील तर त्यांनाही मान्यता दिली जाणार नाही. याशिवाय, या काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या आर्किटेक्‍टच्या माध्यमातून इतर व्यावसायिकांनी प्रस्ताव दाखल केलेले असतील तर त्यांना आर्किटेक्‍ट बदल करून घेऊन महापालिकेला प्रस्ताव द्यावे लागतील, असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)