अर्थसंकल्प ट्विटरवर फुटला 

-विधानसभेत विरोधकांचा सभात्याग ः अर्थमंत्र्यांवर आणणार हक्कभंग
– मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी सभागृहाची माफी मागावी 
मुंबई – विधानसभेत अर्थसंकल्प सादर होत असतानाच त्याचवेळी अर्थसंकल्पातील तरतूदी आणि त्यातील घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून जाहिर होत असल्याबद्दल विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि त्यातील घोषणा समजून घेण्याचा हा सभागृहाचा आणि आमदारांचा अधिकार आहे. मात्र, अर्थमंत्र्यांनी सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप करीत मुुख्यमंत्री व मुनगंटीवार यांनी सभागृहाची माफी मागावी, अन्यथा अर्थमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा कॉंग्रेसने दिला आहे.

झाल्या प्रकाराबद्दल विरोधकांनी आक्षेप घेत विधानसभेत सभात्याग केला. त्यासंदर्भात पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारचा निषेध करीत अर्थसंकल्पाची चिरफाड केली. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे गटनेते विजय वडेट्टीवार व उपनेते नसीम खान उपस्थित होते.

कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळत अर्थसंकल्प मांडत असताना तो अगोदर सोशल मिडीयावर कधीच फुटला नव्हता. यापूर्वी असे कधीच घडलेले नाही. मात्र, राजकारणासाठी आणि आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात फक्त योजना वाचून दाखवण्याचे काम केले आहे. यातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल असे कोणतेच चित्र अर्थसंकल्पात दिसत नसून अडचणीत असलेल्या शेतकरी, कामगार, गरीब वर्गासाठी त्यांनी कोणत्याच घोषणा केलेल्या नाहीत, याकडे थोरात यांनी लक्ष वेधले.

रिकामे तुणतुणे वाजवणे… 
अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थंसंकल्प म्हणजे जनतेला दाखवलेले लॉलीपॉप आहे. “देणे नाही, घेणे नाही, रिकामे तुणतुणे वाजवणे…’ अशी अर्थसंकल्पाची खिल्ली उडवत मतांचे दान मिळवण्यासाठी हा प्रयत्न असल्याची टिका वडेट्टीवार यांनी केली. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. पावणेपाच वर्षांत एक रुपया वाढवून दिला नाही. या योजनेतील लोकांबरोबरच या सरकारने शेतकऱ्यांनासुद्धा फसवले असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. “आकड्यांचा खेळ सारा, राज्याचा उडाला बोजवारा…’, “अंमलबजावणीत सारे तोकडे, घोषणांचा मात्र पाऊस पाडे…’ अशी शेरोशायरी करीत त्यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)