बीएसएनएल लॅंडलाइन सेवा ‘डेड’

तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने ग्राहक संतप्त

पुणे – शहरातील विविध भागात भारत दूरसंचार निगमच्या (बीएसएनएल) लॅंडलाइन सेवेचा बोजवारा उडाला आहे. लॅंडलाइन दूरध्वनी बंद असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून याबाबत बीएसएनएल कंपनीकडूनही तातडीने कुठलीही दखल घेतली जात नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलची सेवा विस्कळित होत आहे. ती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडतच आहे. दूरध्वनी क्षेत्रात अव्वल असणाऱ्या बीएसएनएल कंपनीला गेल्या काही वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. मोबाइल सेवेच्या आगमनानंतर सर्वाधिक फटका बसला आहे, तो लॅंडलाइन सेवेला. आज अनेक ठिकाणचे लॅंडलाइन बंद पडले आहेत. विशेषत: अनेक शहरांतही लॅंडलाइन सेवा आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

पुणे शहरातही घरगुती लॅंडलाइन सेवा तर आता बंद झाली असून व्यापारी क्षेत्रात मात्र काही ठिकाणी या सुविधेचा वापर केला जातो. विशेषत: दुकांनातील स्वॅप मशीनसाठी लॅंडलाइन आवश्‍यक असतात. या दूरध्वनीवरुन इंटरनेट सुविधा पुरविण्यात येत असल्याने हे सुविधा आवश्‍यक असते. पण, पुणे शहरातील प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावरील अनेक दुकानांमधील लॅंडलाइन सुविधा सध्या बंद आहे. एक ते दोन दिवस नाही, तर चक्क तीन ते चार आठवड्यांपासून ही सेवा बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत बीएसएनएलच्या बाजीराव रस्त्यावरील मुख्य कार्यालयात तक्रारीसुद्धा करण्यात आल्या. परंतु, अद्याप या लाइनची दुरुस्ती झालेली नाही.

लॅंडलाइन बंद असल्याने सगळ्यात मोठी समस्या, ही कार्ड पेमेंटची होत आहे. आजकाल ग्राहक रोख रक्कम घेऊन फिरत नाहीत. अनेक वेळा कार्ड पेमेंट करतात. लॅंडलाइन बंद असल्याने कार्ड पेमेंट होत नाही. मग आम्हाला दुसरीकडून जावून कार्ड स्वाइप करावे लागते. अनेक वेळा ग्राहक निघून जातात, परिणामी व्यवसायाचे नुकसान होत आहे.
– अनूप शहा, प्रतिभा वस्त्रनिकेतन.


लॅंडलाइन दूरध्वनी बंद असल्याची तक्रार दिली आहे. दुरुस्ती होईल, असे बीएसएनएलकडून सांगण्यात येत आहे. पण, अद्याप मात्र दुरुस्ती झालेली नाही. केबल तुटल्याचे कारण दिले जाते, पण ते कधी दुरुस्त होणार हे मात्र सांगितले जात नाही.
– सचिन कटारिया, आझाद क्‍लॉथ स्टोअर्स.

विकासकामांमुळे अडचण
शहरात सध्या सगळीकडे विकासकामे सुरू आहेत. त्यात अनेक वेळा जमिनीखालून जाणाऱ्या बीएसएनएल केबलला धक्का लागून त्या तुटतात. त्यामुळे संबंधित परिसरातील लॅंडलाइन दूरध्वनी बंद पडतात. ही केबल नक्की कोठे तुटली? हे तपासणे अवघड असते. कारण, रस्ते खोदाई ही ठिकठिकाणी सुरू असते. त्यामुळे तुटलेली केबल शोधणे आणि त्यानंतर तिची दुरुस्ती अडचणीचे असते. त्यात फार वेळ जातो.

बीएसएनएल अधिकारी म्हणतात…
“लक्ष्मी रस्त्यावर काही ठिकाणी रस्ते खोदाई सुरू आहे. यामुळे केबल तुटली असण्याची शक्‍यता आहे. आता ही केबल दुरुस्ती झाल्यावर तातडीने हे दूरध्वनी सुरू होतील. खोदाई करण्यासाठी पालिकेकडून परवानगी मिळविण्यात अनेक अडचणी येत असतात. खोदाईचे दर प्रचंड असल्याने त्या दराने काम करणे बीएसएनएलला परवडत नाही. त्यात परवानगीदेखील लवकर मिळत नसल्याने अडचणी येतात,’ असे बीएसएनएल अधिकाऱ्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)