बीआरटीच्या सुरक्षा रक्षकांची ‘वाऱ्यावर वरात’

पिंपरी – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर निगडी ते दापोडी दरम्यान काही महिन्यांपूर्वी बीआरटी सेवा सुरु करण्यात आली आहे. बीआरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी होवू नये यासाठी माजी सैनिकांची सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या सुरक्षा रक्षकांना कसल्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. याबाबत बीआरटीच्या संबधित विभागाशी संपर्क केला असता अधिकाऱ्यांकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाली.

बीआरटी मार्गावर सुरक्षा रक्षक म्हणून सुमारे 80 माजी सैनिकांची नेमणूक केली आहे. बीआरटी मार्गावरील खासगी वाहने रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांना मार्गावर आडवी दोरी हातात धरुन उभे राहावे लागते. तर बस आल्यास दोरी काढावी लागते. यामुळे तासन्‌तास भर उन्हात सुरक्षा रक्षकांना उभे रहावे लागत आहे. त्यांना बसण्यासाठी कुठलीही व्यवस्था बीआरटी प्रशासनाने केली नाही. त्यांना बसायला खुर्ची नसल्याने त्यांना दगडावर बसावे लागते तर, कधी उन्हातच उभे राहावे लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत बीआरटी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते त्यांचे कामच असून खुर्ची दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. बऱ्याच ठिकाणी तर बीआरटीकडून दिलेल्या दोरी तुटल्या आहेत. यामुळे काही सुरक्षा रक्षकांनी स्वखर्चाने दोरी आणून लावली आहे. एकेकाळी देशासाठी आपला प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांना सावली साठी फाटके-तुटके बॅनर लावून सावली निर्माण करावी लागत आहे. सुरक्षा रक्षकांना अत्यंत धोकादायक पद्धतीने रस्त्यावर दोरी धरुन थांबावे लागते. त्यांना साधे पिण्याचे पाणी देखील मिळत नाही.

जवळपास स्वच्छतागृहाची सोय नसल्याने कुचंबना होत आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावत आहेत. याबाबत पीएमपीएमएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, आपल्याकडे सुरक्षा रक्षकांकडून सुविधांबाबत कोणतीही मागणीच आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)