ब्रिटिशकालीन पुलाचे कठडे तुटले!

अपघातांचा धोका ः कठड्याचे घडीव दगड गायब

महाळुंग इंगळे – पुणे – नाशिक महामार्गावरील वाकी येथे सुमारे 128 वर्षांपूर्वीचा भामा नदीवरील जुन्या पुलाचा संरक्षक कठडा सध्या धोकादायक झाला आहे. हा जुना ब्रिटीशकालीन पूल सध्या भक्कम असला तरी पुलाचा घडीव दगडांचा कठडा काही भागात तुटला असून, यामुळे या भागात नदीवर येणारे नागरिक आणि जुन्या रस्त्याच्या वापर करणारे नागरिक यांच्यासाठी हा पूल आता अपघाताचा निमंत्रक झाला आहे.

या जुन्या रस्त्यावरील पुलाचा फारसा वापर होत नसला तरी मोठ्या संख्येने फिरण्यासाठी आणि पोहण्यासाठी नागरिक येत असतात. कठडा तुटलेला असल्याने पुलावरून थेट नदीच्या पात्रात पडून अपघात होण्याची शक्‍यता आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील या जुन्या पुलाचे बांधकाम सन 1891 ते 1892 या दरम्यान झाले होते. ब्रिटीशकालीन असलेला या उंच आणि भक्कम पुलावर भामाच्या कसल्याही महापुरात कधीही पाणी आलेले नाही. यावरून त्याची बांधणी लक्षात येते. 2001मध्ये 127 कोटी रुपये खर्च करून खेड ते नाशिक फाटा महामार्ग रुंदीकरण करताना या पुलालगत नवा पूल बांधण्यात आला आहे.

नवीन पूल बांधताना जुन्या पुलावरील वळण लक्षात घेऊन नवीन पूल समांतर काही अंतरावर उभारण्यात आला. त्यामुळे 110 वर्षानंतर पुणे – नाशिक रस्त्यावरील या जुन्या पुलाचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला वापर थांबला. सध्या या जुन्या पुलाचे ब्रिटीशकालीन घडीव दगडी असलेले संरक्षक कठडे कठडे तुटले असून, त्यामुळे हा पूल जीवघेणा झाला आहे. या ठिकाणी एक बगीचा असून त्याठिकाणी अनेक नागरिक फिरण्यासाठी येत असतात. नदीवर महिला कपडे धुण्यासाठी व नागरिक उन्हाळ्यात आंघोळीसाठी येत असतात. त्यामुळे पुलावरून एखादी व्यक्ती खाली नदीत पडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का ? असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
या भागात अनेक युवक भरधाव वेगात दुचाक्‍या दामटत असतात. त्यामुळे वाहन सरळ नदीत कोसळण्याची भीती आहे.
चाकण परिसरातील भामा नदीवरील या जुन्या पुलाच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)