व्यक्‍तिमत्त्व : विकतचा श्वास

सागर ननावरे 

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. ती बातमी वाचून आश्‍चर्य ही वाटले अन्‌ धक्‍काही बसला. ती बातमी अशी होती की, आता माणसाला जगण्यासाठी बाटलीबंद प्राणवायू (ऑक्‍सिजन) विक्रीसाठी उपलब्ध. एखाद्या आजारी व्यक्‍तीला रुग्णालयात ऑक्‍सिजन पुरविला जातो हे माहीत होते. परंतु आता आपल्यालाही जगण्यासाठी हा शुद्ध प्राणवायू विकत घ्यायची पाऴी येणार आहे, ही कल्पनाच स्वप्नवत वाटत होती. परंतु सुदैवाने?(दुर्दैवाने) ही बातमी खरी होती. चीनमध्ये माणसाला जगण्यासाठी बाटलीबंद ऑक्‍सिजन विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांतच त्याची रेकॉर्डब्रेक अशी खरेदी होताना दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही बातमी वाचून मनात विचार आला की आज चीनसारख्या विकसित देशात ऑक्‍सिजन विकत घ्यावा लागत आहे. पुढे लवकरच आपल्या भारतातही तो विक्रीसाठी बाजारात आल्यास काय होईल? ज्याप्रमाणे निसर्गाने फुकट उपलब्ध करून दिलेल्या पाण्याच्या इंडस्ट्रीने मार्केट काबीज केले आहे. त्याचप्रमाणे एक नवी इंडस्ट्री उद्या नव्याने उदयास येणार. मुंबईसारख्या शहरात ट्रॅफिक पोलीस बुथवर ऑक्‍सिजन मास्क” सध्या पाहायलाही मिळू लागले आहेत.
पर्यावरणाचा होतोय ऱ्हास म्हणून विकत मिळणार श्‍वास अशी काहीशी अवस्था आपल्याला पाहायला मिळणार यात शंका नाही.

प्रगतीच्या नावाखाली मानवाने उंच उंच इमारती बांधल्या. आणि या उंच इमारतीच्या हव्यासापायी स्वतःसाठी खड्डा खोदून घेतला. पर्यावरणाची केलेली अपरिमित हानी आता आपल्या विनाशास कारणीभूत ठरणार आहे.
भारत हा तसे पाहता खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. (जायचा). 90 च्या दशकापासून मात्र कॉंक्रीटच्या जंगलाने संपूर्ण भूमीला विळखा घालायला सुरुवात केली. आणि आज अगदी डोंगरावरही हिरवळ दिसणे दुर्मिळ होऊन बसले आहे.

लोकांनी उच्च शिक्षण,उच्च राहणीमान आणि सुख सुविधांच्या हव्यासापायी खेडेरूपी नंदनवनाचा त्याग केला. सुखसुविधांसाठी निसर्गाला ओरबाडून त्याचा जो बळी घेतला जातोय हे मोठे दुर्दैव आहे.
आता या शहरीकरणाच्या मायाजाळात शहरी लोकांना पुन्हा निसर्गरम्य गावाची ओढ लागली आहे. कृषी पर्यटन, खेड्यांच्या सहली, गावची टूर पर्यटनात प्रथम पसंतीचे ठरत आहे. शुद्ध हवा आणि खेड्यातील वातावरण शहरी लोकांना आकर्षित करीत आहे. झाडांच्या सावलीसाठी गावाकडे वळणारे त्याच झाडांच्या संवर्धनासाठी उत्सुक नाहीत याची खंत आहेच.

मला माझ्या वाचनात आलेली एक आधुनिक गोष्ट आठवते. खेड्यात राहणाऱ्या जीवन नावाच्या तरुणाला शहराचे मोठे आकर्षण होते. उंच उंच इमारती आणि मोठी बाजारपेठ नेहमीच त्याला खुणवायचे. जीवनचे सारे मित्रही शहरात वास्तव्यास होते. एकदा जीवनने त्याच्या मित्राकडे गावाकडचे घर व जमीन विकून शहरात राहायला जाण्याबाबत इच्छा व्यक्त केली. मित्राने त्याला कारण विचारले, तेव्हा तो म्हणाला अरे इथे रस्ते नीट नाहीत, सर्व सुखसुविधा नाहीत त्यापेक्षा शहरात कसे सर्व छान आहे.

मित्राने जीवनसाठी एक घर पाहिले. जीवनला ते शहरात असणारे घर खूप आवडले. जीवनने गावाकडचे सर्व विकून शहरात स्थायिक झाला. वर्षामागून वर्षे सरली जीवनची मुले मोठी झाली. एकदा जीवन असंच पेपर वाचत बसला होता. त्या पेपरमध्ये त्याने एक जाहिरात पाहिली. त्यात लिहिले होते,आता निसर्गाच्या कुशीत स्वच्छ हवेत घ्या मोकळा श्‍वास. निसर्गरम्य परिसरात दोन दिवसांची धमाल सहल.

जीवन आणि त्याच्या पत्नीने त्या ट्रीपसाठी बुकिंग केले. जेव्हा ते दोघे त्या स्थळी पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. तो फार्महाऊस ज्या जागेत उभा होता ती जागा म्हणजे जीवनचे पंधरा वर्षांपूर्वी विकलेले घर होते. तो आत जाताच त्याच्या कानावर हाक पडली, ओ जीवनशेठ ओळखलं का? जीवनाने वळून मागे पहिले तर तो त्याचा बालपणीचा मित्र सुरेश होता. अगदी धिप्पाड, टवटवीत आणि तेजस्वी चेहऱ्याचा. दोघेही भेटले आणि गप्पांत रंगले. जीवनने शहरी थाट दाखवत काय काय कमावले ते सांगितले. आणि सुरेशला विचारले, तू का नाही आला शहरात?
त्यावर सुरेश म्हणाला, कशाला इकतचं पाणी, फुकटचं मोठपण घ्यायला? गड्या गाव नाय, तर समाजात नाव नाय बघ. आणि मला सांग मग तुम्ही शहरात राहणारी हाय फाय माणसं कशाला फिरायला गावाकडं येता?
आता मात्र जीवन शांत बसला. त्याला साऱ्या सुखसुविधा मिळाल्या होत्या. पण गावाकडची शुद्ध हवा, खडकातून वाहणारे नितळ पाणी आणि हिरवा शालू पांघरलेली शेते या गोष्टींचा आनंद त्याला पैसे देऊन घ्यावा लागत होता. गावचे विकलेले घर आणि जमीन याचे दु:ख त्याला अधिक वाटत होते.

मित्रानो, हीच परिस्थिती आज शहरात राहणाऱ्या असंख्य लोकांची आहे. उच्च राहणीमानाच्या नावाखाली निसर्गाने दिलेले फुकटचे सोडून आपण विकतच्या मागे लागलो आहोत. याचा अर्थ असा नाही, की आपण शहरात राहायचे नाही. शहरात राहूनही आपल्याला आपले गावपण जपता आले पाहिजे. गावाकडील घरे विकण्यापेक्षा त्यात सुधारणा करून त्यातच फार्महाउस आपल्याला दिसले पाहिजे. जमिनी विकण्यापेक्षा त्या कसून त्यातून सेंद्रिय अन्नधान्याने आरोग्य समृद्ध करता आले पाहिजे. झाडे तोडण्यापेक्षा त्याच्या सावलीत विसावा घेऊन अधिक झाडे लावता आली पाहिजेच.

निसर्गसान्निध्यात वेळ देऊन पुढच्या पिढीसाठी त्याचे जतन करून ठेवले पाहिजे. अन्यथा श्‍वास घ्यायलाही प्राणवायू शिल्लक राहणार नाही.माणूस पाण्याशिवाय तीन दिवस जगू शकतो, अन्नाशिवाय सात दिवस जगू शकतो.
पण प्राणवायूशिवाय तो दोन ते पाच मिनिटाच्या वर जगू शकत नाही हे लक्षात घ्यायला हवे. विकतचा श्‍वास म्हणजे फुकटचा त्रास याची आता आपल्याला जाणीव व्हायला हवी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)