पाणीपुरवठ्यात ठेकेदारांचे तोडपाणी

पैसे घेऊन जादा पाणी सोडण्याचा उद्योग सुरू

सातारा – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उपनगरांमध्ये केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात ठेकेदारांचे तोडपाणी सुरू आहे. सोसायट्या, कॉलन्यांना पैसे घेऊन जादा पाणी सोडण्याचा उद्योग ठेकेदारांकडून सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तरीही प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्यांचे दुर्लक्ष असल्याने संताप व्यक्त होत आहे. उपनगरांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याने संबंधित ठेकेदाराकडून ठेका काढून घ्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कृष्णा उद्‌भव योजनेतून सदरबझार, शाहूपुरी, गोडोली, कोडोली, विलासपूर, संभाजीनगर, खेड, कृष्णानगर, करंजे तर्फ सातारा या परिसरास पाणीपुरवठा केला जातो. प्राधिकरणाला अद्यापही सक्षम अधिकाऱ्यांची गरज असल्याचे सध्याच्या कारभारावरुन स्पष्ट होत आहे. पूर्णवेळ अधिकाऱ्यांची आवश्‍यकता असतानाही ही जागा रिक्त ठेवल्याने उपनगरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. चुकीची पाणीबिले, पाणीगळती, कृत्रिम पाणीटंचाई अशा समस्यांवर अद्याप तोडगा काढलेला नाही. प्रत्येक कामासाठी ठेकेदार नेमूनही समाधानकारक कामे होत नसल्याने अधिकारी केवळ ठेकेदार पोसण्याचे काम करत आहेत का? असा सवाल केला जात आहे.

उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच उपनगरांमध्ये पाणीटंचाईची ओरड होऊ लागली आहे. कृष्णा नदीला भरपूर पाणी आहे. प्राधिकरणाकडून पाण्याचा पूर्ण क्षमतेने उपसा केला जातो. मात्र, पाणी वितरणात गडबड का होते? पाणी वितरणाचा ठेका दिल्याने संबंधित ठेकेदाराचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने चिरीमिरी किंवा तोडपाणी होत असल्याच्या नागरिकांतून तक्रारी होवू लागल्या आहेत. अपार्टमेंटला पाणी येणाऱ्या पाईपलाइनच्या व्हॉल्वचे आटे कमी करून कॉलन्यांना मुबलक पाणी दिले जात आहे. पाणी सोडण्याच्या बाबतीत मोठमोठ्या स्कीम किंवा नागरी वसाहतीच्या बाबतीतही अशाच पद्धतीचा गोलमाल केला जात आहे.

याबाबत लोकांनी प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल न घेता दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित ठेकेदाराला ताकीदही दिली जात नाही. अशा तक्रारींवर अभियंत्यांनी हात वर केले आहेत. त्यांच्याकडून लोकांची बोळवण केली जाते. उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकारी प्रयत्न करत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. ठेकेदाराकडून पाण्याचा केला जाणारा “बाजार’ थांबला नाही तर नागरिकांनी प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

प्राधिकरणाचे अधिकारी ठेकेदारांच्या गराड्यात महाराष्ट्र जीवन प्रारिकरणातील वरिष्ठ अधिकारी नेहमीच ठेकेदारांच्या गराड्यात असतात. काही अधिकारी तर ठेकेदारांसोबत आलिशान हॉटेलात पार्ट्याही झोडतात.
अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील या सलगीचा कामकाजावर परिणाम होत आहे. काही ठेकेदार तर अधिकारी आपल्या खिशात असल्याच्या अविर्भावात असतात. अशा ठेकेदारांमुळे प्राधिकरणाची वाट लागली आहे. अभियंते ठेकेदाराच्या आहारी गेल्यासारखे चित्र प्राधिकरणात असून त्यामुळेच तक्रारी होऊनही ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)