घरात घुसून तोडफोड ः टोळक्‍यांच्या वैमनस्याने परिसरात दहशत

पिंपरी – दोन टोळक्‍यांमधील वादाचा फटका रहाटणी परिसरातील नागरिकांना सोसावा लागत आहे. रहाटणी येथील पवनानगर व गंगानगर परिसरात दहा ते बारा तरुणांनी हातात कोयते घेऊन धुडगूस घातला. दोन टोळ्यांनी एकमेकांच्या परिसरात घुसून दहशत माजवली. नागरिकांच्या घरात घुसून गुंडांनी तोडफोड करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मंगळवारी (दि.27) रोजी सकाळी आठ व सायंकाळी सातच्या सुमारास घडला.

या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी सुदाम गणपत मांडलिक (वय-45 रा, रहाटणी) यांनी फिर्याद दिली असून अमोल मोहिते, मनोज लोंढे, सुनिल ठाकूर, स्वप्निल तलवार, पप्या भवारी व यांचे दोन ते तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून स्वप्नील तलवार व त्याचे दोन साथीदार तसेच तीन अल्पवयीन मुलांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी गंगानगर परिसरात अशाच प्रकारे कोयता घेऊन दहशत घातल्याप्रकरणी धर्मवीर विजयकुमार मोहिते (वय-27 रा. रहाटणी) याने फिर्याद दिली असून सुमित सोमवंशी, शुभम कवठेकर, दिपक धोत्रे, पवन उर्फ भैय्या मंडलिक व त्यांचे तीन ते चार साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील दिपक धोत्रे अटकेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडलिक व मोहिते यांच्यात जुनी भांडणे आहेत. त्यातूनच मांडलीक व मोहिते यांच्या टोळ्या विरोधी टोळीच्या परिसरात जाऊन दहशत माजवतात. बेकायदेशीर जमाव करुन कोयते हातात घेऊन टोळकी नागरिकांच्या घरात घुसले. घरातील सामानांची, खिडकी, दरवाजांच्या काचा यांची कोयत्याने तोडफोड केली. सांगवी पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटांतील आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दोन्ही गटात जुनी भांडणे आहेत. मोहिते व मांडलिक यांच्यावर या आधीही वाकड, पिंपरी व सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे दोन्ही टोळ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
– प्रभाकर शिंदे,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)