नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर ई-चलन’द्वारे ‘ब्रेक’

लोणावळा वाहतूक पोलिसांची कारवाई : चालकांना वेसण
महिनाभरात पर्यटननगरीत 700 जणांकडून दंड वसूल

लोणावळा – महिनाभरापूर्वी लोणावळा वाहतूक पोलिसांच्या हातात आलेल्या “ई-चलन यंत्रणेचा धाक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर चांगलाच बसला आहे. मागील महिनाभरात लोणावळा वाहतूक पोलिसांनी ई-चलनद्वारे सुमारे 700 हुन अधिक जणांना दंड आकारला आहे.

डिजीटलचे वारे सर्वच क्षेत्रात वाहत असून, मागील काही वर्षांत ऑनलाइन व्यवहारांकडे लोकांचा कल अधिक वाढला आहे. नोटाबंदीनंतर अनेकांनी रोकडरहित व्यवहारांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. सरकारकडूनही डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी देखील महिनाभरापूर्वी “एक राज्य, एक चलन’ या संकल्पनेच्या आधारावर ई-चलन व्यवस्था सुरू केली आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांकडून ई-चलनामार्फत दंड वसूल करता यावा. त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी रस्त्यावर पावती पुस्तक घेऊन उभ्या राहणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या हातात पुस्तकाऐवजी या ई-चलन मशीन दिसू लागल्या आहेत.

वाहतुकीबाबत चालकांना कितीही शिस्तीचे धडे दिले, तरी नियम पायदळी तुडवणाऱ्या चालकांची संख्या कमी नाही. त्यामुळे वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्या वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी आणि वाहतूक शिस्तीसाठी केंद्र शासनाने दंडाची रक्‍कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम आकारण्यासाठी वाहतूक पोलीस ई-चलन यंत्राचा प्रभावी वापर करताना दिसत आहे.

आता केवळ लोणावळा शहराचा विचार करता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह परराज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने आपापली वाहने घेऊन येत असतात. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच अनेकदा वादविवाद होण्याचे प्रसंग ही उद्भवत असतात. त्यापार्श्‍वभूमीवर ही ई-चलन यंत्रना वाहतूक पोलिसांसाठी निश्‍चितच मोठी उपयोगी ठरते आहे.

लोणावळा शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय जांभळे, सुनील मुळे, पोलीस नाईक नितेंद्र कदम, पोलीस शिपाई रवींद्र सरसे, जीवन गवारी, चंद्रकांत गव्हाणे त्याचप्रमाणे मदतनीस होमगार्ड सतीश ओव्हाळ, दर्शन गुरव, अंकुश गायखे आणि प्रकाश मराठे यांनी केवळ मागील एक महिन्याच्या कालावधीत या ई-चलनद्वारे मोठी कारवाई करीत 50 हजारांहून अधिक रुपयांचा दंड बेशिस्त वाहन चालकांना ठोठावला आहे. पैकी दंडाची निम्मी रक्‍कम ई-पेमेंट/ई-चलन स्वरूपात, तर निम्मी रक्‍कम रोख स्वरूपात वसूल केली आहे.

ई-चलन यंत्रणेची वैशिष्ट्ये…

ई-चलन या यंत्राचा आकार मोबाईलसारखा आहे. त्याला छोटेखानी प्रिंटर “ब्ल्यू टूथ’ने जोडण्यात आला आहे. नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांकडून या यंत्रणेद्वारे दंडाची रक्‍कम आकारण्यात येते. दंडाची रक्‍कम भरल्यानंतर त्याला लगेचच पावती देण्यात येते. समजा एखाद्या वाहनचालकाने हुज्जत घातली, तर त्याचे छायाचित्र काढण्याची सुविधाही या यंत्रात आहे. त्याचे छायाचित्र आणि केलेले वर्तन याबाबतची माहिती ऑनलाईन पद्धतीने याच यंत्राद्वारे नोंदविण्यात येते. पकडलेल्या चालकाकडे पैसे नसल्यास ई-चलन यंत्राद्वारे त्याला त्याचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून (स्वाईप करून) दंडाची रक्‍कम भरता येते. कार्डही नसल्यास त्याला पोलीस ई-चलन जारी करतात. त्याबाबतचा लघुसंदेश चालकाला प्राप्त होतो आणि भविष्यात ठरवून दिलेल्या मुदतीत दंडाची रक्‍कम त्याला भरता येते. यामुळे वाद, संघर्षांचे प्रमाण कमी कमी झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)