मेंदूतील रक्तवाहिन्यांचे आजार (भाग १)

डॉ. शाम अष्टेकर 
मेंदूचा रक्‍तपुरवठा निसर्गाने फार चांगला ठेवलेला आहे. यात अनेक पर्यायी मार्ग असतात. मेंदू व चेतासंस्था ही अत्यंत नाजूक संस्था आहे. रक्‍तप्रवाहात दोन-तीन मिनिटे खंड पडला तरी मेंदूचा संबंधित भाग कायमचा बिघडू शकतो. हृदयविकाराच्या झटक्‍यात दोन-तीन मिनिटांत परत हृदयक्रिया चालू झाली नाही तर पुन्हा हृदयक्रिया चालू होऊनही उपयोग नसतो; कारण मेंदूतल्या पेशी तेवढ्या काळात मरण पावतात. 
हृदयविकारात जसा रक्‍तप्रवाह खंडित होतो, तसाच मेंदूचा झटका असतो. याची तीन प्रकारची कारणे असू शकतात. रक्‍तवाहिनीत गुठळी होणे, रक्‍तस्राव होणे, रक्‍तदाब अचानक कमी झाला तर मेंदूचा रक्‍तप्रवाह कमी होणे, यामुळे मेंदूच्या संबंधित भागातल्या पेशी मरून अवयव निकामी होतात. या आजाराचा एक प्रकार तात्पुरता असतो. याचे कारण म्हणजे रक्‍तदाब तात्पुरता कमी होऊन मेंदूच्या पेशींना कमी रक्‍त पोचणे.
लक्षणे – 
संबंधित अवयव (हात, पाय, चेहरा), इ. तात्पुरते (काही मिनिटे) दुर्बल होतात. पण 24 तासांत ही परिस्थिती सुधारते. रक्‍तप्रवाहातला खंड तात्पुरता असेल, तर नुसती चक्‍कर येते किंवा शरीराचा संबंधित भाग तात्पुरता बिघडतो. यात झटका येतो किंवा शक्‍ती जाते. रक्‍तप्रवाह दीर्घकाळ बंद पडला तर संबंधित भागातली शक्‍ती, हालचाल जाऊन लुळेपणा येतो. बिघाडाचे प्रमाण फार मोठे असेल तर शरीरात व्यापक बिघाड होतो. यामुळे इतर अंतर्गत संस्था बंद पडणे किंवा बिघडणे, बेशुद्धी, श्‍वसन किंवा हृदयक्रिया बंद पडणे, इत्यादी गंभीर परिणाम संभवतात. अशा लुळेपणालाच आपण अर्धांगवायू किंवा अंगावरून वारे जाणे असे म्हणतो. यामुळे मृत्यूही येऊ शकतो.
कारणे – 
भारतामध्ये या मेंदू-झटका/अर्धांगवायूचे प्रमाण हजारी लोकसंख्येत दोन इतके आढळते. या व्यक्‍ती उतारवयातल्या किंवा वृद्ध असतात. वाढत्या वयोमानाने या आजाराचे प्रमाण समाजात वाढतच जाणार आहे. अतिरक्‍तदाब हे या आजाराचे एक प्रमुख कारण आहे. एक तर या आजारात रक्‍तवाहिन्या कडक झालेल्या असतात. जादा रक्‍तदाबाने त्या फुटतात. छोट्या रक्‍तवाहिन्या फुटल्या तर थोडे नुकसान होते व ते भरून येते. मोठ्या रक्‍तवाहिन्या फुटल्या तर खूप नुकसान होते. धूम्रपान, लठ्ठपणा, मधुमेह, उतारवय, रक्‍तातील मेद वाढणे ही या आजारामागची महत्त्वाची कारणे आहेत. या कारणांमुळे रक्‍तवाहिन्या फुटणे किंवा गुठळ्या होण्याची शक्‍यता निर्माण होते. मेंदूचा रक्‍तपुरवठा अनेक मार्गांनी होत असला तर सर्वच रक्‍तवाहिन्या या कारणांनी खराब झालेल्या असतात. वरचा रक्‍तदाब 70 पेक्षा कमी झाला तर असा मेंदू आघात होऊ शकतो. याला विविध कारणे आहेत.
हृदयविकाराचा झटका हे त्याचे प्रमुख कारण असते. तसेच अतिरक्‍तदाबावर नियमित उपचार करणे हे मेंदू-आघात टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. रुग्णांना हे पटवले पाहिजे. मेंदूच्या विशिष्ट भागात शरीराच्या विशिष्ट भागांचे नियंत्रण असते. तसेच मेंदू व चेतारज्जूच्या विशिष्ट भागातून संबंधित शरीराच्या संदेशांची ने-आण होत असते. नियंत्रण करणारा भाग किंवा संदेशवहन सांभाळणारा भाग यापैकी कोणत्याही भागात बिघाड होऊ शकतो. या भागामध्ये दाब येणे, रक्‍तपुरवठा बंद पडणे, पू होणे, मार लागणे यापैकी काही झाल्यास शरीराच्या संबंधित भागात शक्‍ती कमी होते किंवा लुळेपणा येतो.
लक्षणे व चिन्हे – 
अ) उभ्या शरीराचा अर्धा भाग (एक हात व पाय), चेहऱ्याचा अर्धा भाग किंवा
ब) कमरेखाली दोन्ही पाय, मेंदूच्या एका (डाव्या किंवा उजव्या) भागात बिघाड झाला तर डोक्‍याखालच्या भागातील शरीराची विरुद्ध बाजू बिघडते.
तात्पुरता किंवा कायमचा अर्धांगवायू – 
अर्धांगवायू कधी कधी तात्पुरता असतो, तर कधी कधी कायमचा. अर्धांगवायूचा झटका आल्यावर पहिल्या दोन-तीन दिवसांत शरीराचा कोणकोणता भाग लुळा पडणार हे ठरून जाते. दोन-तीन महिन्यांनंतर काही रुग्णांमध्ये थोडी थोडी सुधारणा होण्याची शक्‍यता असते. मात्र, काही जणांच्या बाबतीत सुधारणा होत नाही. मानसिक, शारीरिकदृष्ट्या खचल्याने बरेच रुग्ण या आजारात दगावतात. मेंदू आघाताचे वेळीच निदान करण्यासाठी खालील खुणा महत्त्वाच्या आहेत. यातले एकही चिन्ह असल्यास सावध व्हावे; आणि वैद्यकीय मदत मिळवावी. चेहऱ्याचे स्नायू सैलावणे. हात सैल व अशक्‍त होणे. 
बोलण्यात बदल – 
अवघडलेपण रुग्ण बोलू शकत नाही किंवा बोलणे अस्पष्ट होते. रक्‍तदाब वाढलेला असू शकतो. किंवा अगदी कमीही असू शकतो. त्वचेवर बधिरता – संवेदना कमी होणे. विचित्र वास, चव, ध्वनि किंवा दृष्टीभ्रम होणे. डोळ्यांच्या पापण्या जडावणे, अर्ध-मिटल्या होणे. गिळण्याची क्रिया अवघड जाणे एका डोळ्याची बाहुली विस्फारणे किंवा प्रकाशाला लहान न होणे. तोल जाणे श्‍वसन अनियमित होणे. चक्कर येणे. प्रथमोपचार रुग्णाला प्रथम धीर द्यावा. रुग्णाला आडवे ठेवावे, शक्‍यतो कुशीवर ठेवावे म्हणजे श्‍वसन सोपे जाते.
मेंदूतील रक्तवाहिन्यांचे आजार (भाग २)

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)