उंची वाढविण्यासाठी काही उपाय असतात का? हा प्रश्न बुटक्या आई-वडिलांचा अगदी जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यांना स्वत:ला आलेल्या मानसिक ताणातून निदान आता आपल्या मुलाला तरी जावे लागू नये, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. त्यासाठी शक्य झाल्यास ते महागडे उपाय करायलाही तयार असतात. अशा मुलांच्या पालकांना योग्य त्या माहितीची, सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते. उंची वाढणे शक्यच नसेल तर, वस्तुस्थिती म्हणून स्वीकार करण्यास आणि आपले मूल आहे तसे आनंदाने स्वीकारण्यास शिकविले पाहिजे.
आपल्याकडे जे कमी असतं, त्याची प्रत्येकालाच ओढ असते. गरिबीला श्रीमंतीची, व्यस्त व्यक्तीला फुरसतीच्या क्षणांची आणि बुटक्या व्यक्तींना उंचीची आस असते. आपण आहोत त्यापेक्षा उंच असतो तर किती बरं झालं असतं! असं अनेकांना वाटतं. उन्हाळ्याची सुट्टी लागली की, “उंची वाढविण्या’च्या वर्गाची जाहिरात पाहून कित्येक पालकांना आपल्या मुलांना तिकडे पाठवावेसे वाटते.
कोणत्याही व्यक्तीचा रंग, आकार आणि ठेवण यापेक्षा प्रथमदर्शनी त्या व्यक्तीची उंचीच लगेच लक्ष वेधून घेते. उंचापुरा माणूस आपल्या नजरेत चटकन् भरतो. व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यात उंची हा खूपच महत्त्वाचा घटक आहे. उंचीमुळे थोड्या फार प्रमाणात त्या व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. बास्केट बॉल, टेनिस इत्यादी खेळांमध्ये उंच खेळाडूंचेच वर्चस्व असते. लग्न जमण्यामध्येसुद्धा उंच स्त्री-पुरुषांना त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे चांगला जोडीदार मिळण्याची शक्यता असते. 5 फुटांपेक्षा कमी असलेली स्त्री आणि 5.5 फुटांपेक्षा कमी उंचीच्या पुरुषांना इंग्लंड, अमेरिकेत नोकरी मिळण्याची किंवा जोडीदार मिळण्याची शक्यता फारच कमी होऊन बसली आहे. 140 सें.मी.पेक्षा कमी उंचीच्या मातांचे गर्भारपण हे जोखमीचे समजले जाते.
शरीराच्या विकासाचे मोजमाप म्हणजे वजन आणि उंची. जन्मापासूनच वजन आणि उंची यांची वाढ होत असते. वाढण्याचा वेग मात्र सर्वकाली एकसारखा नसतो. ठराविक वयातील वजन किंवा उंची मोजणे महत्त्वाचे असतेच, पण त्याहीपेक्षा ठराविक कालावधीत होणारी वाढ अधिक महत्त्वाची मानली जाते. म्हणजेच वाढीपेक्षा वाढीचा वेग मोजणे अधिक महत्त्वाचे असते.
नवजात बालकाची सरासरी लांबी 50 सें.मी. मानली जाते. वयाच्या पहिल्या वर्षी महिन्याला 2 सें.मी. अशा वेगाने उंची 25 सें.मी. वाढून एका वर्षाच्या बाळाची लांबी 75 सें.मी. इतकी होते. दुसऱ्या वर्षी महिन्याला 1 सें.मी. या वेगाने 12 सें.मी. वाढते. 2 वर्षे ते 12 वर्षे या वयात (पौगंडावस्था सुरू होईपर्यंत) उंची दरवर्षी 6 से.मी.ने वाढते.
उंची ही पूर्णपणे अनुवंशिक असते आणि आई-वडिलांची उंची कमी असेल तर मुलांची उंची कमीच राहते, हा समज थोड्या प्रमाणात खरा आहे. अफगाणिस्तानातील पठाण, आफ्रिकेतील मसाई अनुवंशातील व्यक्ती उंच असतात; तर आफ्रिकेतील पिग्मी जमात कमी उंचीसाठी प्रसिद्ध आहे.
जपानमध्ये 1960 पासून 1990 पर्यंत स्त्री-पुरुषांची उंची सरासरी 6 इंच इतकी वाढली. इतकेच नव्हे तर इंग्लंडसारख्या देशामध्ये वाढलेल्या भारतीय लोकांच्या मुलांची उंचीसुद्धा 7-8 इंचाने जुन्या पिढीपेक्षा वाढली आहे. याचाच अर्थ अनुवंशिकतेचा मुलांच्या उंचीवर होणारा परिणाम मर्यादित आहे. कुपोषणामुळे मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. कुपोषण नुकतेच सुरू झाले असेल तर वजन वाढायचे थांबते; पण मूल दीर्घकाळ कुपोषित असेल तर वजन आणि उंची या दोन्हीवर परिणाम होतो.
उंचीने कमी असलेल्या मुलाचे वजन त्याच्या उंचीला साजेसे असेल तर ते केवळ खुजे (बुटके) समजावे; कुपोषित नव्हे.
उंची कमी-जास्त असणे हे बहुतेक वेळा पायांची लांब हाडे आणि पाठीच्या कण्यांची लांबी या दोन गोष्टींवर ठरते.
पाठीचा कणा मानेतील 7, छातीच्या 12 आणि कमरेच्या 5 मणक्यांचा बनलेला असतो. पाठीच्या कणाच्या लांबीची उंची वाढविण्यात महत्त्वाचा भाग नसतो; पण आहे ती उंची कमी दिसण्यात किंवा होण्यात मणक्यांची रचना महत्त्वाची ठरते.
उंचीचा विचार करताना, मांडीचे हाड (फिमर) आणि पायातले गुडघ्याखालचे हाड (टायबिया) महत्त्वाचे ठरते.
या हाडांच्या टोकाजवळ असणारा भाग (मेटाफिसिस) किती कार्यक्षम राहतो यावर हाडांची लांबी (आणि म्हणून व्यक्तीची उंची) ठरते.
मुलांच्या वाढीचे तीन खंड पडतात. या तीनही कालखंडात विविध घटकांचा उंची वाढविण्याशी संबंध असतो.
अगदी बाल्यावस्थेत म्हणजे दोन वर्षापर्यंत समतोल आहार (पोषण हाच उंचीवर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पहिल्या दोन वर्षात पोषण कमी पडले तर त्याचे दूरगामी परिणाम होतात. दोन वर्षांच्या शेवटी मुलांची उंची सरासरीपेक्षा 2-3 इंच कमी असली तर ती भरून काढता येत नाही. पुढील वाढीमध्ये ही तूट कधीच भरून काढता येत नाही. या पुढच्या अवस्थेत आहाराबरोबरच ग्रोथ
हार्मोन्स आणि थायरॉक्सिन या दोन संप्रेरकांचा उंचीवर सर्वाधिक परिणाम होतो. हे दोन्ही कमी प्रमाणात तयार झाल्यास उंची खुंटते. ग्रोथ हार्मोन झोपेमध्ये रक्तात सोडले जाते. वाढ चांगली होण्यासाठी चांगली, झोप, पुरेसा व्यायाम आणि मानसिक शांततेची नितांत गरज असते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा