देहुरोड – पुणे येथील जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जीपीए) आयोजित डॉक्टर महिला बॉक्स क्रिकेटचे अजिंक्यपद देहुरोड डॉक्टर्स असोसिएशनच्या हिरकणी संघाने पटकावले. सलग दोन वर्षे हिरकणी संघ पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अजिंक्य ठरला.
पुणे येथील विजन अकॅडमी येथे महिला बॉक्स क्रिकेट स्पर्धा रविवारी (दि. 5) झाली. या स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला होता. पुणे, हडपसर, येरवडा, चंदननगर, विमाननगर, सिंहगड, खराडी, नांदेड सिटी, सांगवी, भोसरी व देहुरोडचे सुमारे 120 महिला डॉक्टर सहभागी झाले होते.
देहुरोडच्या हिरकणी संघाने अंतिम फेरीत सांगवी संघाला विजयासाठी सहा षटकांत 44 धावांचे आव्हान ठेवले होते. सांगवी संघ 35 धावांवर आटोपला. विजेत्या हिरकणी संघाला करंडक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून देहुरोड हिरकणीची संघनायक डॉ. वैष्णवी नाईकरे, उत्कृष्ट गोलंदाज डॉ. वरदा कुलकर्णी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सांगवी संघाची डॉ. प्राची इंगवले यांनी मिळवले.
हिरकणी संघाच्या डॉ. क्षिप्रा लवणे, डॉ. मीनाक्षी जाधव यांनीही वैयक्तिक पारितोषिक मिळवले. डॉ. कविता सांडभोर यांनी संपूर्ण स्पर्धेत यष्टीमागे पाच बळी टिपले. तसेच एकूण 38 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यात डॉ. अपर्णा पाटील यांनीही क्षेत्ररक्षणात नेत्रदीपक कामगिरी केली.