एक लाखांच्या सहा दुचाकी जप्त ः स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नगर – वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या सहा दुचाकी जप्त करत त्यात राहुरी आणि नेवासेमधून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. विशाल संभाजी सुतार (वय 34, रा. सरकारी हॉस्पिटलसमोर, वांबोरी, ता. राहुरी) व सोमनाथ गंगाधर वाघडकर (वय 19, रा. वाघडकर वस्ती, भेंडा कारखाना, ता. नेवासे) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. अनिल विष्णू साळवे (रा. जोशी वस्ती, ता. अशोकनगर, श्रीरामपूर) हा त्यांचा तिसरा साथीदार पसार झाला आहे.
जिल्ह्यात दुचाकी चोरांचे प्रमाण वाढले आहेत. दैनिक प्रभातने या दुचाकी चोरींच्या वाढत्याप्रमाणावर लक्ष वेधले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी स्वतः लक्ष घालून, यात मोठी कारवाई केली आहे. दिलीप पवार यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. राहुरीतील विशाल सुतार याच्याकडे चोरीच्या दुचाकी आहेत. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथून चोरून आणलेली दुचाकी नंबर प्लेट बदलून तो वापरत होते. सुतार याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने त्याच्या साथीदारांची नावे सांगितली. वाघडकर याला ताब्यात घेतले, तर साळवे पसार झाला.
या तिघांनी नेवासे, राहुरी, शिरूर (जि. पुणे), कळवण (जि. नाशिक, पन्हाळा (जि. कोल्हापूर) येथून दुचाकी चोरी केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. चोरीच्या दुचाकी वाघडकर याच्या घरी ठेवलेल्या होत्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. सुमारे 1 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या या दुचाकी आहेत. श्रीरामपूर, शिरूर, कळवण व राहुरी पोलीस ठाण्यात या चोरीच्या दुचाकींच्या नोंदी आहेत. अटक केलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी श्रीरामपूर पोलिसांकडे वर्ग केले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा