ग्रेट पुस्तक : ‘सेमी प्रायव्हेट रूम…’

अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार…

आयुष्यात माणसाला काय मिळवायचे असते हे खरे तर न उलगडणारे कोडे आहे. आहे त्या गोष्टीत समाधान नसतेच मुळी. पण काही काही प्रसंग एखाद्याच्या आयुष्यात असे येतात की तो आतून बाहेरून पार बदलून जातो. आणि अकाली मोठा होतो.काहींच्या बाबतीत ते इतरांना सुखदायक असते तर काहींच्या बाबतीत असे अकाली मोठे होणे फार अवघड होऊन बसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज ज्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे ते आहे डॉ. अमित बिडवे यांचे “सेमी प्रायव्हेट रूम…’ ही कथा फिरत राहते एक दहा वर्षाचा मुलगा आणि 70 वय वर्षाच्या एका वृद्धाभोवती. होशांग नावाचा हा गोड़ चुणचुणीत मुलगा कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला बळी पडतो. हॉस्पिटलमधे त्याला भरती करतात एका “सेमी प्रायव्हेट रूम’मध्ये. तिथेच नाना सुखात्मे नावाचे रागीट, चिडचिडे गृहस्थ अॅॅडमिट होतात नाईलाजाने.

खरे तर नानाला स्वतंत्र रूम हवी असते पण खोली रिकामी नसल्यामुळे नाईलाज होतो. कुरकुरत नाना तिथे राहायला तयार होतात. यामध्ये नानाची बायको आणि होशांगची आई यांच्यामध्ये आत्मीयता निर्माण होते. होशांग आपल्या लाघवी स्वभावामुळे हॉस्पिटलमधील सगळ्या स्टाफची मने जिंकून घेतो. त्याचा समंजस पणा त्याला होत असलेला त्रास नानामधे हळूूहळूू बदल घडवून आणतो.

होशांगला पूर्ण विश्वास असतो की तो बरा होणार त्या निरागस जीवांचे असे समंजस वागणे पाहून आपले डोळे ओले होतात. दुसरीकडे हॉस्पिटल मधील इतर स्टाफ त्यांच्यातील प्रेमाची गुंफण डॉक्टरांनी अतिशय नाजूकपणे हाताळली आहे. बाथरूममधे पडल्यामुळे नानांना झालेली दुखापत आणि त्याचा त्यांनी केलेला बाऊ. दुसरीकडे कॅन्सरसारखा वेदनादायी आजार असूनही सतत समंजसपणा दाखवणारा होशांग, नानाच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असलेल्या नानी आणि मुलाचा त्रास कमी व्हावा यासाठी स्वत:चे सर्वस्व पणाला लावणारी होशांगची हतबल आई, अपयशामुळे खचलेला होशांगचा बाबा, हॉस्पिटलच्या स्टाफची सुख-दुःख, त्यांच्यात निर्माण झालेली ओढ, हे सगळे वाचताना पुस्तक हातातून ठेवावेसे वाटत नाही.

कुठेतरी आपण खूप गुंतत जातो काही क्षणासाठी ती पात्र आपल्याच आयुष्याचा भाग आहेत असे वाटायला लागते. होशांग बरा होतो की नाही? नाना त्याच्या स्वतःच्या मुलासोबत जुळून घेतात की नाही या घटनेचा त्याच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? होशांगचे आई बाबा त्यांचे पुढे काय होते, हॉस्पिटलमधील स्टाफच्या आयुष्याला कसे कसे वळण मिळत जातात? हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा “सेमी प्रायव्हेट रूम,’ शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे पुस्तक.

– मनीषा संदीप


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)