ग्रेट पुस्तक : बेधुंद

नमस्कार,

अस्मिताच्या वाचकांना यावेळी त्यांच्या कॉलेज जीवनात प्रवास करायला लावणाऱ्या पुस्तकाची ओळख करून देणार आहे. पुस्तकाचे नाव आहे “बेधुंद’ लेखक आहेत अविनाश लोंढे. ही कथा सुरू होते पाच मित्रांच्या कॉलेज मैत्रीपासून. जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा हे फाईव्ह स्टार इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला. पहिलेच वर्ष अन्‌ तिथे चालणारी चोरी छुपे रॅगिंग अन्‌ त्यातून निर्माण झालेली मैत्री अन्‌ दुश्‍मनी घेऊन बेधुंद जगात त्यांचा प्रवास चालू होतो. जयंतच्या आयुष्यात हर्षला येते अन्‌ तिचा भाऊ हर्षलसोबत वादाची ठिणगी पडते आणि सुरुवात होते दुश्‍मनीला. अक्षय सरळ अन्‌ घरातील परिस्थितीची जाणीव असलेला. एका कार्यक्रमा दरम्यान सोनिया म्हणजे कॉलेजमधील सगळ्यात सुंदर अन्‌ हुशार मुलगी. हिच्याशी त्याची मैत्री होते. अश्विनी या फाईव्ह स्टारची जवळची मैत्रीण. हुशार अन्‌ वेळीच स्वतःला सावरणारी. धाब्यावर यांची मैत्री फुलते खरी पण पुढे यांच्या आयुष्यात एक एक घटना अश्‍या घडत जातात की सगळे सुन्न होतात. खरं तर यावेळी मी तुम्हाला कथा सांगणार नाहीए पण फक्त एव्हडेच सांगेन की, हे पुस्तकं तुमच्या आयुष्यातील काही सोनेरी क्षण परत आणेल. हे बेधुंद क्षण थोड्या फार फरकाने तुम्ही नक्की जगलेले असणार.

लेखकाने भाषासुद्धा कॉलेजच्या मुलांच्या तोंडी असणारी लिहिली आहे. प्रेम, आणि त्यापलीकडे असलेले संबंध, मैत्री, रात्रभर अनोळखी मुलीसोबत केलेले चॅटिंग त्यातून निर्माण झालेली मैत्री, परीक्षा, अभ्यास, स्वप्न, दुश्‍मनी त्यातून घेतलेला सूड, ताटातूट, बेधुंद वातावरणातील व्यसन, ओढ, जातीवरून होणारी भांडणे, मजा मस्ती अन्‌ या सगळ्यांचा प्रत्येकाच्या आयुष्यावर होणारा वेगवेगळा परिणाम. थोडक्‍यात निसरड्या रस्त्याची ही वाट कोणी कशाप्रकारे पार करायची ज्याने त्याने ठरवायचे. हे वय धुंद होण्याचे आहे की आपल्या आयुष्याला योग्य वळणं देणारे आहे, याचा सारासार विचार देणारे पुस्तकं आहे. लिखाण बिनधास्त आहे, नातेसंबंध उघड आहेत, कॉलेजच्या मुलांच्या तोंडी असणारी भाषाही आहे, पण कुठे तरी वास्तव दर्शविणारे पुस्तकं आहे. हे पुस्तकं वाचून नक्कीच महाविद्यालयीन मुलांना कसे वागू नये कळेल. कदाचित होणाऱ्या चुका टाळता येतील. कथेमधे अनेक पात्र आहेत त्यांचे परस्परांशी येणारे सबंध कथेमधे खिळवून ठेवतात अन्‌ क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवतात.

जया अन्‌ हर्षालीचे प्रेम, अक्षय आणि सोनियात असलेले नाते तिच्या आयुष्यात असलेला आधीचा प्रियकर. अक्षयच्या आयुष्यात येणाऱ्या इतर मुली, सुरेश आणि अण्णा यांचे शैक्षणिक निकाल. मोठ्या पदावर पोचलेले विद्यार्थी, अन सुन्न करणारा शेवट. विचार करायला लावणारा शेवट. अनपेक्षित धक्कादायक शेवट. बेधुंद जगा पण आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतोय याचा विचार करा. सहज सोपा दिसणारा पण अडवळणाचा रस्ता जपून पार करा असा संदेश डोळसपणे देणारे पुस्तक करमणूक करणारे तर आहेच पण तितकेच खूप काही शिकवून जाणारे आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस यांचे आहे. तर नक्की वाचा ही तरुणाईला बेधुंद करणारी कादंबरी.

धन्यवाद

– मनीषा संदीप

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)