-जलवाहिनीचे काम सुरू झालेच नाही ः प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम
-ना पोलीस बंदोबस्त, ना कोणी अधिकारी, ना जलवाहिनीचे काम करणारा ठेकेदार
शिंदे वासुली – भामाआसखेड (ता. खेड) प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी व जॅकवेलचे काम शुक्रवारी (दि. 10) पोलीस बंदोबस्तात सुरू होणार असल्याचे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले होते. जलवाहिनीचे काम सुरू होणार असल्याची कुणकुण लागताच आज सकाळी भामाआसखेड प्रकल्पग्रस्तांनी विरोध करण्यासाठी जय्यत तयारी केली होती; परंतु 12 वाजले तरी ना पोलीस बंदोबस्त, ना कोणी अधिकारी, ना जलवाहिनीचे काम करणारा ठेकेदार. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना प्रशासनाने गुगली टाकल्याचे स्पष्ट झाले.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी सूचना केल्याप्रमाणे काम सुरू करण्यापूर्वी संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी कामास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने चर्चा करावी असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला सांगण्यात आले होते. या संदर्भात चाकण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी आज सकाळी करंजविहीरे येथे भामाआसखेड प्रकल्पग्रस्तांची बैठक घेतली. पोलीस प्रशासनाचे वतीने सर्व प्रकल्पग्रस्तांना जलवाहिनीच्या चालू होणाऱ्या कामाला विरोध करु नये. सहकार्य करण्याचे आवाहन केले; परंतु उपस्थित प्रकल्पग्रस्त जोपर्यंत पुनर्वसन संबंधित सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत विरोध करणार असून काम चालू होऊ देणार नसल्याचे निर्णयावर ठाम होते.
दरम्यान सहायक पोलीस आयुक्त अलसटवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या जलवाहिनीचे काम पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस ठाण्याच्या देखरेखीखाली संपूर्ण पोलीस बंदोबस्तात होणार असल्याचे सांगितले. आम्हाला आदेश मिळाल्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कामाच्या ठेकेदाराला पोलीस बंदोबस्त देऊन पूर्णतः सहकार्य करणार असल्याचे सांगितले. आमचे कर्तव्य पार पाडत असताना कोणी अडसर निर्माण केल्यास अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.
भामा आसखेड धरणग्रस्तांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी अनेकवेळा आंदोलने केली. आधी पुनर्वसन मग काम या मुद्द्यावर ठाम राहून महानगरपालिकेच्या जलवाहिनीचे काम अनेकवेळा बंद केले आहे. जलवाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम वारंवार बंद झाल्याने होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन कामापासून फारकत घेत असल्याचे सांगितले होते. हे दोन महिन्यांपासून बंद असलेले काम पोलीस बंदोबस्तात चालू होणार असले तरी येथील प्रकल्पग्रस्त विरोध करण्यासाठी पेटून उठलेल्या आहेत.
करंजविहीरे येथे झालेल्या बैठकीतील अहवाल वरिष्ठांना तसेच जिल्हा प्रशासनाला देण्यात येणार असून वरिष्ठांच्या आदेशानुसार ज्यावेळी काम सुरू होणार आहे. त्यावेळी पोलीस बंदोबस्त देणार असल्याचे चाकण पोलीस ठाण्याचे वतीने अलसटवार यांनी सांगितल्याचे उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी सांगितले; परंतु जलवाहिनीचे काम कधी सुरू होणार हे निश्चित माहिती नसल्याने येथील प्रकल्पग्रस्त संभ्रमात आहेत किंवा जिल्हा प्रशासन व पुणे महानगरपालिकेने (दि.10) मेपासून पोलीस बंदोबस्तात काम सुरू होणार असल्याची गुगली टाकली. असेच प्रकल्पग्रस्तांना गाफील ठेवून अचानक काम चालू करणार तर नाही ना, अशी भीती शेतकरी व्यक्त करतात.
महानगरपालिकेच्या जलवाहिनीचे कामाला चाकण पोलीस ठाण्याचाच बंदोबस्त असणार असून वरिष्ठांच्या आदेशानुसार विरोध करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व प्रकल्पग्रस्तांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे.
-चंद्रकांत अलसटवार, सहायक पोलीस आयुक्त.आता भय ना चिंता. मागे अनेकदा आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. कितीही पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. विरोध करुन काम बंद करण्यासाठी भामा आसखेड प्रकल्पग्रस्त हजारोंच्या संख्येने पुढे येणार आहेत.
– एक आंदोलक, भामा आसखेड प्रकल्पग्रस्त, शेतकरी.