बॉम्बच्या अफवेने साताऱ्यात खळबळ

माहुली रेल्वे स्थानकावर कोयना एक्‍स्प्रेस एक तास थांबवल
सातारा – बुधवारी (ता. 27) दुपारी कोयना एक्‍सप्रेस माहुली रेल्वे स्थानकावर बॉम्बच्या अफवेने एक तास रोखून धरण्यात आली. रेल्वेमध्ये बॉम्ब असल्याचा फोन सातारा पोलीस मुख्यालयात आल्याने पोलीस यंत्रणेची एकच धावपळ झाली. बॉम्बशोधक पथकाने साताऱ्यात रेल्वेची कसून तपासणी सुरू केल्याने प्रवाशांचे श्‍वास रोखले गेले. मात्र संपूर्ण तपासणीत काहीच न आढळल्याने बॉम्बची माहिती अफवा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रवाशांसह तपास यंत्रणांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये रेल्वे स्टेशनवर धाव घेऊन रेल्वे थांबवली.

बॉम्ब शोधक पथकाद्वारे रेल्वेमध्ये तपासणीला सुरुवात केली असता त्यामध्ये काहीही सापडले नाही. दरम्यान, या घटनेने प्रवाशांमध्ये भिती निर्माण झाली असून पोलिसांनी कोणत्याही अफवेवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, बुधवारी (ता.27) दुपारी कोल्हापूर-मुंबई या कोयना एक्‍सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलिस मुख्यालयातील कंट्रोलरुममध्ये आला. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तत्काळ स्वत:सह पोलिस अधिकार्यांसोबत साताऱ्यातील माहुली रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली. साताऱ्यातील बहुतेक पोलिसांना फोन करुन रेल्वे स्टेशनवर पोहचण्याचे आदेश झाल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले. तोपर्यंत बॉम्ब शोधक पथक, डॉग स्कॉड यासह पोलिस कर्मचार्यांचा फौजफाटा रेल्वे स्टेशनवर आला.

रेल्वे स्टेशनवर अचानक गर्दी सुरू झाल्याने नागरिक बुचकाळ्यात पडले. संपूर्ण रेल्वे स्थानकं दहा मिनिटात तातडीने रिकामे करण्यात येऊन प्राथमिक दक्षता यंत्रणा सतर्क करण्यात आली. बॉंब थोधक पथक व पोलिसांनी रेल्वे स्थानकाचा ताबा घेतला आणि कसून तपासणी केल्यानंतर रेल्वेत काहीच संशयास्पद आढळून आले नाही. कोयना एक्‍सप्रेस मुंबईहून साताऱ्यात 4 वाजता आल्यानंतर पोलिसांनी सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. पोलिसांच्या या आदेशामुळे प्रवाशांमध्ये उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्व रेल्वेची तपासणी करण्यास सुरुवात केली. सुमारे अर्धा तास तपासणी केल्यानंतरही त्यामध्ये आक्षेपार्ह काहीही सापडले नाही. एक तास तपासणी केल्यानंतर सर्व प्रवाशांना रेल्वेमध्ये बसवण्यात आले व रेल्वे कोल्हापूरच्या दिशेने सव्वा तासाच्या विलंबाने रवाना झाली.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)