भोवरी

शुभदा अ. पटवर्धन 

य. त्र्यं. भालेराव 

तळपाय व पायाच्या बोटांवर, बोटांमध्ये किंवा तळभागाकडील त्वचेमध्ये, बाह्यत्वचेतील शृंगस्तरापासून घर्षण किंवा दाब यामुळे होणाऱ्या शंक्वाकार छोट्या आकारमानाच्या कठीण गाठीला भोवरी म्हणतात. या ठिकाणी शृंगीभवन मर्यादित व स्थानीय स्वरूपाचे असते. शृंगस्तरातील कोशिकांची (पेशींची) अतिवृद्धी हे या विकृतीचे प्रमुख कारण असते. ज्या ठिकाणच्या त्वचेवर हाडाचा दाब पडतो त्या ठिकाणी अशी वाढ होते.

पुष्कळ वेळा अयोग्य किंवा नीट न बसणाऱ्या पादत्राणामुळे भोवरी उत्पन्न होते. भोवरीचा अंतःस्थ भाग जेव्हा मऊ ऊतकावर (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहावर) किंवा तंत्रिकांवर (मज्जांवर) टेकतो, तेव्हा दाबामुळे वेदना उत्पन्न होतात. कधीकधी विद्रूप बोटाच्या वरच्या टोकावर पादत्राणाचा दाब सतत पडून तेथील त्वचेत भोवरी तयार होते.

भोवरीचे दोन प्रकार आहेत : 
(1) कठीण आणि (2) मऊ. बोटांच्या बेचक्‍यात विशेषेकरून चौथ्या व पाचव्या बोटांच्या दरम्यान होणारी त्वचावाढ मऊ प्रकारात मोडते. दोन बोटांमध्ये अत्यल्प जागा असल्यास त्या ठिकाणी घर्षण आणि ओलसरपणामुळे मऊ भोवरी तयार होते. अशी भोवरी दाबरहित असूनही वेदनाजनक असते. भोवरीमध्ये सूक्ष्मजंतूंच्या संक्रामणाचा नेहमी धोका असतो. सूक्ष्मजंतू-संक्रामण व वेदना यांमुळे अपंगत्वही संभवते.

पायात काटा मोडून किंवा अनवाणी चालताना खडा बोचून त्या जागी अवतीभवती त्वचा-ऊतकाची कठीण गाठ बनते. अशा गाठीला सर्वसाधारण भाषेत कुरूप म्हणतात. मांडी घालून जमिनीवर बसणाऱ्यांच्या घोट्याच्या बाह्य (जमिनीवर टेकणाऱ्या) भागावरील त्वचा कठीण व जाड बनते, त्यासही दाब व घर्षण कारणीभूत असतात. विशिष्ट काम करणाऱ्या कामगारांच्या तळहातावरही काही जागी त्वचा जाड व कठीण बनते. या प्रकाराला घट्टा म्हणतात. घोड्यामध्येही, विशेषेकरून पुढच्या दोन खुरांवर अयोग्य नाला ठोकल्यामुळे भोवरी उत्पन्न होते.

उपचार 

बाजारात कॉर्न-क्‍युअर या किंवा इतर नावाखाली भोवरीवर बसविण्याकरिता औषधयुक्त चिकटपट्ट्या मिळतात. या बहुतेकांमध्ये 10 ते 40% सॅलिसिलिक अम्लमिश्रित मलम असते. या औषधामुळे संपूर्ण भोवरी मऊ पडून मुळापासून निघून येते.

घरगुती उपचाराकरिता पाऊल पंधरा मिनिटे गरम पाण्यात बुडवून ठेवल्यानंतर व पूर्णपणे कोरडे केल्यानंतर कलोडियन मिश्रित 10% सॅलिसिलिक आम्ल भोवरीवर लावून वर पट्टी बांधावी. मऊ पडल्यानंतर संपूर्ण भोवरी निघून न आल्यास कापून काढावी लागते. ही शस्त्रक्रिया घरगुती स्वरूपाची समजून ब्लेडने किंवा चाकूने कापण्याचा प्रयत्न करू नये.
अशा शस्त्रक्रियेत जरूरीपेक्षा जास्त त्वचा-ऊतक कापले जाऊन जखम झाल्यास सूक्ष्मजंतू-संक्रमणाचा धोका असतो. मधुमेही रोग्यांनी तर अशी शस्त्रक्रिया कटाक्षाने टाळवी.

अमेरिकेसारख्या काही प्रगत देशांतून फक्त पावलांच्याच रोगांबद्दलचे तज्ज्ञ पाऊल विकृतितज्ज्ञ (चिरोपोडिस्ट) असून ते भोवरीसारख्या पावलांच्या विकृतींवर इलाज करतात.

आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा 
पायामध्ये रुतलेला काटा काढला गेला नाही, तर काही काळाने त्याच्याभोवती तेथे असलेल्या त्वचा व मांस यापेक्षा कठीण अशी त्वचा व मांस शरीराकडून तयार केली जातात; त्या काट्याला बंदिस्त केले जाते. तो शल्य म्हणून शरीराला त्रासदायक होऊ नये म्हणून हा शरीराचा प्रयत्न असतो. काटा ह्या कारणाखेरीजही अशा भोवऱ्या निर्माण होण्याची शरीरात प्रवृत्ती असते. भोवरी न्हाव्याच्या नऱ्हाणीसारख्या शस्त्राने कोरून काट्यासुद्धा भोवरीचा सर्व भाग काढून टाकावा. तापलेल्या तेलाने त्याला चटका द्यावा आणि नंतर व्रणोपचारांनी तो व्रण भरून आणावा, पोटातून त्रिफळा गुग्गूळ मध व तुपातून देत असावे. काटा ह्या कारणावाचून शरीरात भोवरी उत्पन्न होण्याची प्रवृत्ती उत्पन्न झालेली असते तेव्हा ती मांसाची दुष्टी आहारविहाराने झालेली असते.

त्याकरिता ओकारीच्या औषधांनी वांती करून व रेचक देऊन कोठा शुद्ध करून घ्यावा आणि नंतर त्रिफळा, शिलाजतू, ताम्रभस्म, रोप्यभस्म, हिराकसभस्म क्षार, अशी क्षरण करणारी व मांसपाचक द्रव्ये पोटात द्यावी. मोठ्या भोवऱ्या असतील, तर त्या प्रथम सांगितल्याप्रमाणे काढून टाकून पुढचे उपचार करावेत. भोवरी काढून टाकल्यानंतर पुनःपुन्हा उत्पन्न होत असेल, तर क्षार किंवा अग्नी (कढत तेल) ह्यांनी तो व्रण जाळावा व भरून आणावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)