बोफोर्सचे भूत आणि बिगर कॉंग्रेसी सरकारसाठीची पायाभरणी

लोकसभा निवडणूक : 1989

– विनायक सरदेसाई 

इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधी यांनी सत्तासूत्रे हाती घेतली आणि 1989 मध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यावेळी देश संगणकीकरणाच्या दिशेने पुढे जात होता. 84 च्या दारुण पराभवामुळे आश्‍चर्यचकित झालेले विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात ठाम मुद्दा शोधत होते.

राजीव गांधी सरकारचा अर्धा कार्यकाळ संपत आलेला असतानाच स्वीडनच्या कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या बोफोर्स तोफांच्या व्यवहारात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या. यावरुन होणाऱ्या आरोपांमुळे राजीव गांधींच्या सरकारमध्ये सहभागी असलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. पी. सिंग यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी अरुण नेहरू आणि आरिफ मोहम्मद यांना सोबतीला घेऊन जनमोर्चा गठित केला.

व्ही.पी. सिंग पुढील निवडणुकीत राजीव गांधी सरकारचा पाडाव करण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करू लागले होते. त्यावेळी कॉंग्रेस तशी बरीच सशक्‍त होती. त्यामुळेच कॉंग्रेसला एकट्याने आव्हान देणे चुकीचे ठरेल याची कल्पना व्ही. पी. सिंग यांना होती. लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या होत्या. व्ही. पी. सिंग यांनी जनता पार्टी, लोकदल, कॉंग्रेस (जगजीवन) अणि जनमोर्चा यांना एकत्र घेऊन नवा पक्ष काढण्याची रणनीती आखली. जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी म्हणजेच 11 ऑक्‍टोबर 1988 रोजी व्ही. पी. सिंगांच्या नेतृत्वाखाली जनता दलाची स्थापना झाली.

व्ही पी सिंगांनी तेलगु देसम, डीएमके आणि आसाम गण परिषद यांना सोबत घेऊन राष्ट्रीय मोर्चाची स्थापना केली. निवडणुका लढवल्या. या निवडणुकांत जनता दल 143 जागा जिंकून कॉंग्रेसनंतरचा दुसरा मोठा पक्ष म्हणून समोर आला.

भाजपाच्या वाट्याला 85 जागा आल्या आणि डाव्या पक्षांना 50 जागांवर विजय मिळवता आला. या दोन्ही पक्षांनी राष्ट्रीय मोर्चाला बाहेरून पाठिंबा दिला आणि पुढे 12 वर्षांनी विश्‍वनाथ प्रताप सिंग यांनी पुन्हा एका बिगरकॉंग्रेसी सरकारचा प्रमुख म्हणून पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

पाच वर्षांत वाढले 80 पक्ष
आठव्या लोकसभा निवडणुकांसाठी मैदानात उतरलेल्या पक्षांची संख्या अचानकपणाने वाढलेली दिसून आली. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये 33 राजकीय पक्षांचा सहभाग होता. 1989 च्या निवडणुकीत ही संख्या वाढून 113 वर पोहोचली. याचाच अर्थ पाच वर्षांच्या काळात देशाने प्रगती करो वा न करो राजकीय पक्ष मात्र वाढले. दुसरीकडे राष्ट्रीय पक्षांच्या संख्येत केवळ एकाच पक्षाची वाढ झाली. या निवडणुकीत 8 राष्ट्रीय पक्षांनी 471 जागा जिंकल्या. त्याच वेळी प्रादेशिक आणि मान्यताप्राप्त 105 पक्षांनी 46 जागा जिंकल्या. 12 जागा अशा राहिल्या तेथे अपक्ष उमेदवार विजयी झाले.

कॉंग्रेसने गमावल्या 207 जागा
1984 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांचा 400 चा आकडा पार करणाऱ्या कॉंग्रेसला 1989 च्या निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी चांगलेच घेरले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढली गेलेली ही देशातील पहिली निवडणूक होती. निवडणूक प्रचार अभियानातून विश्‍वनाथ प्रताप सिंग आणि चौधरी देवीलाल हे दोघे लोकनायक म्हणून पुढे आले. निवडणुकांचे निकाल हाती आले तेव्हा कॉंग्रेसला तब्बल 207 जागांवर पराभव पत्करावा लागल्याचे स्पष्ट झाले.

राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारला आव्हान देण्यासाठी जनता दलाकडे त्यावेळी व्ही. पी. सिंग आणि देवीलाल यांच्याखेरीज जॉर्ज फर्नांडिस, मुफ्ती मोहम्मद सईद, मधु दंडवते, ज्ञानेश्‍वर मिश्रा, शरद यादव, चौधरी अजित सिंह आणि रामविलास पासवान यांच्यासारखे नेते होते. तेलगु देसमच्या एन. टी. रामाराम यांच्यासोबत त्यावेळी भाजपाचे अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणींसारखे नेते होते. तर डाव्या पक्षांकडे ज्योती बसु आणि सोमनाथ चटर्जी यांची जोडगोळी होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)