सातारा – सातारा जिल्ह्यातील रक्तदान चळवळीने वेगळी उंची गाठली आहे. दात्यांनी सातत्याने रक्तदान करून अनेक आयुष्ये वाचवली आहेत. रक्तदान व संकलन या प्रक्रिया सातत्याने सक्रिय राहिल्या हव्यात असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी केले. जागतिक रक्तदान दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात सातत्याने रक्तदान करणाऱ्या बावीस दात्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. गडीकर बोलत होते. जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले, रक्त विभाग प्रमुख पद्माकर कदम, नितीन शिंगटे, यशवंत गायकवाड, यावेळी उपस्थित होते. डॉ. गडीकर पुढे म्हणाले, रक्तदान करणे म्हणजे एखाद्या जीवनाला जीवदान देण्यासारखे आहे. साताऱ्याच्या रक्तदान चळवळीने वेगळी उंची गाठली आहे. येथे सव्वाशे पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारी अजित कुबेर यांच्यासारखी मंडळी आहेत. त्यांच्यावर आणि या चळवळीवर बोलताना किंचित दडपण होते मात्र सर्व रक्तपेढया व सर्व स्वयंसेवकांचा उत्तम समन्वय त्यातून रक्त संकलन प्रक्रियेला गती मिळाली आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदाते सातत्याने उपलब्ध राहणे याकरिता रक्तपेढी व रक्तदानासाठी दात्याला तयार करणे, रक्तदानाविषयी जनजागृती करणे ही प्रक्रिया सातत्याने चालायला हवी अशी अपेक्षा डॉ. गडीकर यांनी व्यक्त केली.
सचिन नामदेव पवार, शेखर घाडगे, महेश क्षीरसागर, हणमंत कुंभार, सागर शिंदे, सिद्धार्थ सालीम, वैभव इंगवले, आनंद पंचपोर, प्रफुल्ल सावंत, दत्ता शिंदे, रवींद्र मारूती पवार, सोमनाथ सपकाळ, महेश यादव, चिंतामणी काटवटे, कविराज सावंत, समाधान शेलार, अनुप कोल्हापुरे, असिफ नगारजी, या अठराजणांसह महालक्ष्मी रक्तपेढी कराड, डॉ. गिरिश पेंढारकर माऊली रक्तपेढी सातारा, अक्षय रक्तपेढी सातारा, जिल्हा रुग्णालय रक्तपेढी सातारा यांचा यावेळी ग्रंथ प्रमाणपत्र व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्तविक व रक्तदान चळवळीची माहिती विक्रांत देशमुख यांनी दिली. चिंतामणी कारवारे, ऍड. नितीन शिंगटे, यशवंत गायकवाड यांनी यावेळी विचार व्यक्त केले. रमेश बोराटे यांनी आभार मानले. डॉ. शिरिषा पेंढारकर, प्रा. प्रकाश धनावडे, राजेंद्र घोरपडे, सागर घोरपडे, ताज मुलाणी यावेळी उपस्थित होते.