सुरेंद्र गुदगेंचा आरोप “महालॅब’चे कंत्राट रद्द करण्याची मागणी
सातारा – ग्रामीण जनतेच्या आरोग्याची जपणूक करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रक्तचाचणी घोटाळा झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केला. रक्तचाचणी न करता बिले काढणाऱ्या महालॅब कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी गुदगे यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुदगे यांनी हा गंभीर आरोप केला.
जिल्ह्यात 72 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून त्याठिकाणी रूग्णांच्या रक्ततपासणी करण्याचे कंत्राट महालॅब कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विकास सोनावणे या रूग्णाने रक्ततपासणी केलेली नसताना त्याचे बिल कंपनीला अदा करण्यात आले आहे. मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज सरासरी 25 रूग्ण उपचारासाठी येत असतात. प्रत्येक रूग्णाच्या नावे सरासरी दोनशे ते तीनशे रूपये प्रमाणे रोज हजारो रूपयांचा घोटाळा केला जात आहे.
मायणी एक प्रातिनिधीक उदाहरण असून रक्ततपासणी घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने रूग्णांच्या नावे काढण्यात आलेल्या रक्ततपासणी बिलांची सखोल चौकशी करून कंपनीचे टेंडर तात्काळ रद्द करावे, अशी मागणी गुदगे यांनी केली. त्यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी गुदगे यांनी केलेल्या आरोपाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूध्द आठल्ये यांना दिले.
त्याचबरोबर यावेळी गुदगे यांनी मायणी आरोग्य केंद्रात सापाने दंश केलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याचा विषय मांडला. आरोग्य विभागाने वेळीच आवश्यक औषधे उपलब्ध करून ठेवली असती तर युवकाचा मृत्यू झाला नसता. आरोग्य विभागाचा दुर्लक्षपणा एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकतो, हे प्रातिनिधीक उदाहरण समोर आले आहे, असे सांगून गुदगे यांनी प्राथमिक शिक्षकांच्या समानीकरणाप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची समान नियुक्ती करावी, अशी मागणीही केली.