निकालाबाबत लबाडी झाल्यास रस्त्यांवर रक्त सांडेल – बिहारमधील महाआघाडीचा इशारा

पाटणा – सत्ताधाऱ्यांविषयी जनतेच्या मनात प्रचंड संतापाची भावना आहे. त्यामुळे सत्ताधारी एनडीएला अनुकूल स्थिती निर्माण करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत लबाडी केली गेल्यास रस्त्यांवर रक्त सांडेल, असा इशारा बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीने मंगळवारी दिला.

महाआघाडीची येथे संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी राजदचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पूर्वे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मदनमोहन झा, रालोसपचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांच्याबरोबरच इतर मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. पत्रकार परिषदेत कुशवाहा यांनी अतिशय आक्रमक भूमिका मांडली. याआधी मतदान केंद्रे लुटण्याचे प्रकार कानावर पडायचे. यावेळी निकालच लुटण्याचे प्रयत्न होण्याविषयी संशय व्यक्त होत आहे.

इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) फेरफार करून किंवा मतमोजणी केंद्रांवर इतर मार्गांनी निकालाबाबत लबाडी केली जाऊ शकते. मात्र, एनडीएच्या नेत्यांनी कुठले दु:साहस करू नये. अन्यथा, गंभीर परिणाम होतील. त्यासाठी आम्हाला जबाबदार धरले जाऊ नये, असे कुशवाहा म्हणाले.

निवडणूक प्रचारासाठी आम्ही संपूर्ण बिहारमध्ये फिरलो. त्यातून राज्यातील वातावरण महाआघाडीला अनुकूल असल्याचे स्पष्टपणे जाणवले. त्यामुळे बिहारमधील लोकसभेच्या बहुतांश जागा महाआघाडी जिंकेल याची आम्हाला खात्री आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्‍झिट पोल) बिहारमधील 40 पैकी 30 जागा एनडीए जिंकेल, असे भाकीत केले आहे. ते दिशाभूल करणारे आहे, असा आरोपही महाआघाडीच्या नेत्यांनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)