सातारा – मायणी (ता. खटाव) प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त तपासणीची बोगस बिले तयार केलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान, याबाबतचा आरोप करणारे जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेंद्र गुदगे यांना लेखी तक्रार करण्याच्या सूचना शिंदे यांनी केल्या आहेत. गुदगे यांचा अर्ज प्राप्त होताच संबधित कंत्राटदार महालॅब कंपनीवर गुन्हा दाखल करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सुरेंद्र गुदगे यांनी मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची रक्त तपासणी न करता बिले काढण्यात येत असल्याचा आरोप केला होता. प्रत्येक रूग्णामागे सरासरी 200 ते 300 रूपये प्रमाणे रोज हजारो रूपयांची बिले काढण्यात येत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी गुदगे यांनी केली होती. बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूध्द आठल्ये यांना महालॅब घोटाळ्याच्या चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर गुदगे यांना देखील लेखी तक्रार अर्ज सादर करण्याच्या सूचना केल्या. गुदगे यांचा अर्ज प्राप्त होताच महालॅबवर फसवूणकीचा गुन्हा दाखल होणार आहे.