#wari 2019 : धन्य देहूगाव पुण्यभूमि ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ।।

देहूनगरी गजबजली : देऊळवाडा, इंद्रायणी काठी वारकऱ्यांची मांदियाळी
श्रीक्षेत्र देहू – पालखी सोहळ्याच्या भक्‍तीमय वातावरणात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले वारकऱ्यांना सुरक्षितता आणि सोयीसुविधा विविध सेवा संस्था, प्रशासनाकडून देण्यात येत होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविक, वारकरी भक्‍तीमय वातावरणात न्हाऊन निघाले होती.

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांचा 334 वा पालखी सोहळा प्रस्थान सोमवारी (दि. 24) रोजी होत असताना देहू भक्‍तीमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. पहाटेपासूनच इंद्रायणी नदीघाटावर भाविकांनी स्नानविधीसाठी गर्दी केली होती. मुख्य मंदिरात दर्शनासाठी दर्शनबारीने भाविकांनी रांगा लावल्या होत्या. या रांगा मुख्य मंदिरापासून लांबपर्यंत पोहचल्या होत्या. रविवारी सायंकाळी व मध्यरात्री पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावल्याने वारकऱ्यांची निवाऱ्याची गैरसोय झाली होती.

तसेच दुकानापुढील ओटे, पत्र्याचे शेड शाळा विद्यालय नागरिकांचे ग्रामस्थांचे पार्किंग स्थळ मिळेल. त्या ठिकाणी निवारासाठी वारकरी आसरा घेत होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील खोल्या वारकऱ्यांसाठी उघडण्यात आले होते. सकाळपासून सूर्य असताना ऊन-सावलीचा लपंडाव सुरू होता. पालखी प्रस्थान वेळी आभाळ भरून आले होते. हलक्‍या सरींनी पालखीचे स्वागत करीत पावसाचा शिडकावा बसला.

वारकऱ्यांना अन्नदान मंडळाकडून महाप्रसाद जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भाविक वारकऱ्यांसाठी विविध अन्नदान मंडळाकडून अन्नदान करण्यात येत होते. श्री छत्रपती शिवाजी चौक येथे संत तुकाराम अन्नदान मंडळ, मुख्य मंदिराच्या महाद्वार चौकात श्रीमंत नवशा गणपती आणि आंबेडकर चौक येथे दक्षिणमुखी काळा मारुती मंदिर तसेच प्रथमच धर्मवीर चौकात जगदंबा मित्र मंडळ व नवरात्र उत्सव समिती यांच्या वतीने, तर प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ एका कुटुंबाकडून अन्नदान करण्यात येत होते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रुग्णवाहिका सज्ज होते. मुख्य मंदिरात ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बाह्यरुग्ण केंद्र उभारण्यात आले होते. भाविकांना औषध उपचार पुरविण्यात येत होते. सुरक्षितेसाठी ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. ठिकठिकाणी तात्पुरते लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवून होते.

याशिवाय वाहतूक नियंत्रक पोलीस निरीक्षक दिलीप भोसले, सतीश पवार व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून सहाय्यक पोलीस आयुक्‍त श्रीकांत मोहिते, पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात वाहतूक व्यवस्था चोख ठेवल्याने देहू परिसरात वाहतूक कोंडी झाली नाही, ठीक ठिकाणी दिंड्यांनी घेतलेल्या आसराच्या ठिकाणी सुरू असलेली अखंड हरिनाम गजराने तसेच टाळ मृदंग चिपळ्या यांच्या निनादाने देहू परिसर भक्‍ती रसात चिंब
झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)