भाजपाचाच आतंकी चेहरा समोर आला- नवाब मलिक

मुंबई: मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

साध्वी प्रज्ञासिंग म्हटले कि, त्यांनी (हेमंत करकरे) मला चुकीच्या पद्धतीने फसवले होते. मी त्यांना सांगितले होते कि, तुमच्या पूर्ण वंशाचा सर्वनाश होईल. बरोबर सव्वा महिन्याने सुतक लागते. ज्या दिवशी जेलमध्ये गेले होते त्याच दिवशी सुतक सुरु झाले. आणि बरोबर सव्वा महिन्यांनी दहशतवाद्यांनी त्यांना मारले. त्याच दिवशी त्यांचा अंत झाला.

साध्वी प्रज्ञासिंग यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी निषेध केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, या निमित्ताने भाजपाचाच आतंकी चेहरा समोर आला. भाजपा उमेदवार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले आहे. एका बाजूला शहिदांच्या नावे मतं मागायची व दुसऱ्या बाजूने देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहिदांचा अपमान करायचा अशी भाजपाची नीती असल्याचे मलिक यांनी सांगितले.

मोदी सरकार आल्यापासून आतंकवादी लोकांना सोडण्याचे कटकारस्थान सुरू झाल्याची टीका मलिक यांनी केली. जे बॉम्बब्लास्ट घडवतात, जे आतंकवादी आहेत त्यांना तिकीट देऊन आतंकवादाला मदत करण्याची भाजपाची भूमिका स्पष्ट झाली आहे. देशाची जनता अशा लोकांना योग्य धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही,असे मलिक नवाब म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)