भाजपची कामगिरी

– शेखर कानेटकर 

भारतीय जनता पक्षाची स्थापना 1984 मध्ये झाली. त्यानंतर 1989 मध्ये भाजप-सेना युती अस्तित्वात आली. तेव्हापासून 2014 पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा भारतीय जनता पक्षच लढवित आला आहे (अपवाद 1998 चा. त्यावेळी भाजपने कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले व अपक्ष उभे राहिलेल्या सुरेश कलमाडी यांना पाठिंबा दिला होता.) या आठ निवडणुकांत भाजपला पुण्यातून 1991, 1999 व 2014 अशा तीन निवडणुकातच यश मिळाले आहे. या निवडणुकांमध्ये भाजपने जगन्नाथराव जोशी, अण्णा जोशी दोनदा (1989-1991), गिरीश बापट (1996), प्रदीप रावत दोनदा (1999, 2004) व अनिल शिरोळे (2009, 2014) असे स्वतःचे वेगवेगळे सहा उमेदवार दिले. पण त्यापैकी अण्णा जोशी, रावत व शिरोळे या तिघांनाच यश मिळाले. अण्णा जोशी, शिरोळे यांना दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. तर रावत पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाले पण दुसऱ्या संधीचा त्यांना लाभ मिळाला नाही.

1991 मध्ये अण्णा जोशी यांनी भाजपला पुण्यातील पहिला विजय मिळवून दिला. तरीही 1996 च्या पुढील निवडणुकीत त्यांचे तिकीट अनपेक्षितपणे कापले गेले. 1999 मध्ये भाजपला दुसरा विजय मिळवून देणाऱ्या रावतांना 2004 पुन्हा उमेदवारी मिळाली पण ती सार्थकी लागली नाही.

भारतीय जनता पक्षाला पुण्यातून मिळालेले पहिले दोन विजय हे कॉंग्रेस अंतर्गत वादामुळे सोपे झाले. 1991 मध्ये बॅ. गाडगीळ यांना पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसमधील पवार समर्थकांनी “भाजपतील कॉंग्रेसजन’ समजल्या जाणाऱ्या अण्णांना कशी रसद पुरविली हे उघड गुपित आहे. त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला. 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर त्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी नव्हती. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसच्या मतांमध्ये विभागणी झाल्याने भाजपला विजय मिळू शकला. कॉंग्रेसचे मोहन जोशी व राष्ट्रवादीचे विठ्ठल तुपे या दोघांच्या मतांची बेरीज भाजपच्या रावतांपेक्षा जास्त होती. 2004 मध्ये दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाल्याने त्यावेळी रावत यांचा पराभव झाला.

2009 मध्ये भाजपने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिली. पण त्यांना यश मिळाले नाही. पण 2014 मध्ये पुन्हा उमेदवारी मिळाल्यावर असलेल्या मोदी लाटेत त्यांना आजवरच्या विक्रमी मताधिक्‍याने विजय मिळाला. भाजपचा पुण्यातील तिसरा विजय मात्र पूर्ण निर्वेध होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)