भाजपची बारामतीत ‘पवार’नीती!

वेगवेगळ्या विधानांद्वारे काका-पुतण्यास गाफिल ठेवून आगामी विधानसभेत लक्ष्य भेदण्यासाठी राजकीय खेळी?

– रोहन मुजूमदार

पुणे – विरोधी पक्ष, नेत्याला “गाफिल’ ठेवून आपले “लक्ष्य’ भेदण्याचा गुरुमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी “भाजप’च्या ज्येष्ठांपासून छोट्या कार्यकर्त्यांना दिला असल्याने त्याच पद्धतीची “राजकीय खेळी’ राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील “पवारां’विरोधात बारामतीतून खेळत आहेत का? असा सवाल आता राजकीय विश्‍लेषकांना आता पडला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवारांचा पराभव करणे शक्‍य नसल्याचे महसूलमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सोमवारी (दि. 8) बारामतीत पत्रकार परिषद घेऊन मान्य केले. त्यामुळे एकप्रकारे निवडणुकी आधीच भाजपने बारामती विधानसभा मतदारसंघात आपला पराभव मान्य केला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचबरोबर या विधानामुळे अजित पवारांना हायसे वाटेल अशी पुस्ती जोडून पवारांना एकप्रकारे “गाफिल’ ठेऊन आपले लक्ष्य भेदण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील करीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचा विश्‍वास चांगलाच दुणावला आहे. याच विश्‍वासावर 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांनी कळस चढवून संपूर्ण देशात “कमळ’ फुलवले. यात मित्रपक्षांचाही “खारी’चा वाटा असल्याचे म्हटंल्यास वावगे ठरणार नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“चाणक्‍य’ नितीने विरोधकांवर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. राज्यात फडणवीस यांच्याबरोबर गिरिश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांचाही मोलाचा वाटा म्हणावा लागेल. लोकसभा निवडणुकीवेळी चाणक्‍य नीतीने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची बारामती लोकसभा मतदारसंघातच “कोंडी’ करून इतर मतदारसंघ काबीज करण्याची भाजपची रणनीती यशस्वी ठरली आहे. मात्र, बारामती विधानसभा “दादां’मुळे काबीज करणे शक्‍य नसल्याचा निष्कर्ष चंद्रकांत पाटलांनी काढला असला तरी यामागे त्यांची नक्‍कीच “चाणक्‍य’ नीती असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे या चाणक्‍य नीती उघड होण्यासाठी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होईपर्यंत “वेट अँड वॉच’ करावे लागेल.

बारामती विधानसभा मित्र पक्षांच्या गळ्यात मारणार?
अजित पवारांचा पराभव करणे शक्‍य नसल्याचा “बॉम्ब’ टाकून राजकीय वर्तुळात चंद्रकांत पाटलांनी खळबळ उडवून दिली आहे. त्याचबरोबर 2024मध्ये लोकसभा काबीज करू असे ठामपणे सांगून विधानसभेत अजित पवारांविरोधात भाजप उमेदवार उभाच करणार नसल्याची एकप्रकारे जाहीर कबूली पाटील यांनी दिली असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ भाजपच्या कोणत्या मित्र पक्षाच्या गळ्यात मारणार का? हे पाहणे औत्स्युक्‍याचे राहिल.

विधानसभेत “दादां’ची कोंडी करणार?
केंद्रात शरद पवार राज्यात दादा (अजित पवार) “गेमचेंजर’ मानले जातात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे पवारांची कोंडी केली होती,त्याचप्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीत दादांची “कोंडी’ करण्यात भाजपच्या मंत्र्यांना यश येणार का? आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस, गिरिश महाजन, चंद्रकांत पाटील काय “गेम’ खेळतात हे पाहणे औत्स्युक्‍याचे आहे.

बारामतीआड इंदापूर काबीज करणार?
नीरा डाव्या कालव्याचे पाणी बंद करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पवारांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याच्या “वावड्या’ सर्वत्र उठवण्यात आल्या. मात्र, या पाणीबंदचा सर्वाधिक फटका बारामती तालुक्‍यापेक्षा इंदापूर तालुक्‍याला बसणार आहे. त्यामुळे सगळ्याचे लक्ष “बारामती’वर केंद्रीत करून इंदापूर विधानसभेचा “बडा मासा’ गळाला लावण्याचे प्रयत्न मध्यतरी करण्यात आले होते. हे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत का? सरळमार्गाऐवजी आडमार्गाची चाणक्‍यानिती भाजपने खेळली असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावर हा “बडा मासा’ भाजपच्या गळाला लागून भाजप इंदापूरमध्ये कमळ फुलवणार का? हे पाहणे औत्सुक्‍याचे राहिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)