नागरीकत्व व डिग्री विषयी खुलासा करण्याची भाजपची मागणी
नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या उमेदवारी अर्जात सादर केलेल्या काही माहितीविषयी भाजपने आक्षेप घेतला असून राहुूल गांधी यांनी आपली डिग्री आणि नागरीकत्वाविषयी खुलासा करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.
अमेठीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांच्या अर्जातील काही तपशीलाला आव्हान देण्यात आले असून त्यावर येत्या सोमवारी सुनावणी घेण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. या संबंधात बोलताना भाजपचे प्रवक्ते नरसिंहराव यांनी म्हटले आहे की राहुल गांधी यांच्या अर्जातील काही तपशीलावर घेण्यात आलेल्या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी त्यांच्या वकिलांनी काही वेळ मागीतला आहे हा धक्कादायक प्रकार आहे असे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी हे भारतीय नागरीक आहेत की ब्रिटीश नागरीक असा सवाल त्यांनी केला. ते ब्रिटीश नागरीक कधी झाले त्याविषयी त्यांनी वस्तुस्थिती सांगावी अशी मागणीही भाजप प्रवक्त्याने केली.
राहुल गांधी यांच्या पदवी विषयी आक्षेप घेताना नरसिंहराव म्हणाले की त्यांनी एमफिल केली आहे असे सांगण्यात येते. आपण केम्ब्रीज विद्यापीठातून डेव्हलमेंट इकॉनॉमिक्स या विषयात एमफिल केले असे त्यांनी एकदा म्हटले होते आता त्यांनी आपण डेव्हलमेंट स्टडीज मध्ये एमफिल केल्याचे नमूद केले आहे असे भाजपच्या प्रवक्त्याने निदर्शनाला आणून दिले. ते म्हणाले की आम्ही राहुल गांधी यांनी ज्या वर्षी एमफिल केले त्या वर्षीचे त्या विद्यापीठाचे रेकॉर्ड तपासले तेव्हा त्यावर्षी राहुल व्हिन्सी नावाच्या विद्यार्थ्याला ही पदवी मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या देशात आपल्या नोंदी केल्या आहेत काय याचा खुलासा करावा अशी मागणी केली आहे.