नगरमधून भाजपचा सु”जय’! 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती केला पक्षप्रवेश

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसने अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा कॉंग्रेसला सोडण्यास नकार दिल्याने नाराज झालेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सुजय यांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची अहमदनगर लोकसभेसाठी उमेदवारीही घोषित केली.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंगेस यांच्या लोकसभा निवडणूकीसाठी आघाडी झाल्यानंतर डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आपण अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहिर केले होते. परंतु, हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने ती जागा सोडण्यास नकार दिला. दोन्ही पक्षांतील जागांच्या वाटाघाटीत अहदनगरची जागा कॉंग्रेसला मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न झाले. सुजय यांचे वडील व विधानसेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडूनही आपल्या मुलाला हा मतदारसंघ मिळावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. त्यासाठी त्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली. परंतु या भेटीत कोणताच तोडगा निघाला नाही.

तसेच राष्ट्रवादीही आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने सुजय यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी भाजपाचे नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यानुसार मंगळवारी गरवारे क्‍लब येथे अखेर डॉ.सुजय विखे-पाटील यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, भाजपाचे नगरमधील सर्व आमदार यावेळी उपस्थित होते.

नगर हा आता भाजपाचा बालेकिल्ला – मुख्यमंत्री

डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे इतर नगरमध्ये भाजपा आता पॉवरफुल बनला आहे. नगर मधील दोन्ही जागा आपल्याला नुसत्या जिंकायच्या नाहीत तर रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करायच्या आहेत. 2014 मध्ये महाराष्ट्रात युतीला 42 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत युतीला 45 जागा मिळणारच असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुजय यांची उमेदवारी देखील घोषित केली. नगर लोकसभेसाठी सुजय यांचे नाव भाजपाच्या प्रदेश संसदीय मंडळाकडून केंद्रिय संसदीय मंडळाला कळविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील हे मंडळ उमेदवारीचा अंतिम निर्णय घेते. पण आम्हाला विश्वास आहे की सुजय यांचे नाव निश्‍चितच अंतिम करण्यात येईल असेही फडणवीस म्हणाले.

अडचणीच्या काळात मुख्यमंत्र्यांची साथ – सुजय विखे-पाटील

भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय मी आई-वडिलांच्या इच्छेविरोधात जाउन घेतला आहे. गेले महिनाभर माझ्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आज भाजपात प्रवेश करताना आनंद वाटतो आहे. विशेषतः माझ्या अडचणीच्या काळात वडिलांप्रमाणे मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साथ दिली. त्यांची साथ मी कधीच सोडणार नाही. त्यांच्या सोबत मी कायम उभा राहणार आहे. भाजपामधील मंत्री असतील, आमदार असतील या सर्वांनी वडिलकीच्या नात्याने मलासोबत घेतले आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत एकदिलाने आता भाजपासाठी काम करणार आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यात भाजपाला मजबूत करणार असून नगरमधील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकून आणणारच असा विश्वासही सुजय विखे-पाटील यांनी व्यक्त केला. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)