भाजपा लोकसभेच्या 435 जागांवर लढणार

नवी दिल्ली – लोकसभेच्या 543 जागांपैकी भारतीय जनता पार्टी 435 जागा लढवणार असून, उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 429 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते.
आता रालोआमधून तेलगू देसम, राष्ट्रीय लोकशक्ती पार्टी व अन्य पक्ष बाहेर पडले असल्याने भाजपाला अधिक लढवता येणार आहेत.

भाजपाला याहून अधिक जागा लढवता आल्या असत्या, पण यंदा बिहारमध्ये जनता दल (संयुक्त)शी भाजपाचा समझोता झाला आहे. त्या पक्षासाठी भाजपाला आपल्या वाट्यातील पाच जादा जागा सोडाव्या लागल्या आहेत.
भाजपाचा तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकशी समझोता झाला असून, तिथे भाजपाला पाच जागा मिळाल्या आहेत. गेल्या वेळी भाजपाने तामिळनाडूमध्ये 9 उमेदवार उभे केले होते आणि एकच उमेदवार विजयी झाला होता.

केरळमध्ये 20 जागा असल्या, तरी भाजपा 14 ठिकाणीच उमेदवार उभे करणार असून, 6 जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. झारखंडमध्येही भाजपाने ऑल झारखंड स्टुडंट्‌स युनियनशी समझोता करून 1 जागा सोडली आहे. उरलेल्या जागांवर भाजपाच लढेल.

भाजपाचे विविध राज्यांत मिळून 40 मित्रपक्ष आहेत, पण पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा व ओडिशा या राज्यांत भाजपाचा एकही मित्रपक्ष नाही. या राज्यांत भाजपा स्वबळावच लढणार आहे. पश्‍चिम बंगाल व ओडिशामध्ये 2014 साली सर्व जागा लढविल्या होत्या आणि दोन्हीकडे मिळून तीन जागा जिंकल्या होत्या. आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये असलेल्या 42 जागांवर भाजपाने उमेदवार उभे केले होते आणि त्यातील तिघे विजयी झाले होते.

यंदाही या राज्यांत जवळपास सर्व जागा भाजपा लढत आहे, पण तिथे आता भाजपाची फारशी ताकद दिसत नाही. अर्थात, वायएसआर कॉंग्रेस (आंध्र प्रदेश) व तेलंगणा राष्ट्र समिती (तेलंगणा) यांच्या संपर्कात आहे. निवडणूक निकालांनंतर हे पक्ष मदत करू शकतील. त्यामुळे आंध्र व तेलंगणापेक्षा पश्‍चिम बंगाल व ओडिशावरच भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. कॉंग्रेसचा उत्तर प्रदेश, दिल्लीमध्ये अनुक्रमे सपा-बसपा आघाडी व आम आदमी पक्षाशी समझोता न झाल्याने भाजपामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)