निवडणुकीत शिवसेनेमुळे भाजपला फटका बसणार – नितेश राणे

सोलापूर  – अतिरेकी कारवायांबाबत भारताला जसे वारंवार पाकिस्तानने फसविल्यामुळे जगात पाकिस्तानची विश्वासार्हता संपली. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात शिवसेनेची विश्वासार्हता संपली आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेमुळे भाजपाला फटका बसणार असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली. रत्नागिरी- सिंधुदुर्ग यासह महाराष्ट्रात लोकसभेच्या पाच जागा स्वाभिमानी पक्ष लढविणार असल्याचेही आमदार राणे यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सोलापुरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठकीसाठी शनिवारी आमदार राणे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सत्तेत असतानादेखील शिवसेनेने भाजपवर टीकेची झोड उठविली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवाय कोकणातील शिवसेनेच्या नेत्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाजपवर टीका केल्याचे सर्वश्रुत आहे. आता मात्र युती झाल्यानंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे भाजप नेत्यांबरोबर फोटोशेशन करत आहेत आणि यावरूनच शिवसेनेची विश्वासार्हता दिसून येते. तसेच भाजपाची राजकीय गणिते चुकत असून भाजपाला शिवसेनेला सोबत घेतल्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाची फसवणूक
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून सरकारने मराठा समाजातील जनतेला फसविले आहे. आतापर्यंत एकाही तरुणाला बॅंकांनी कर्ज दिलेले नाही. त्यामुळे आता बॅंक फोडायची वेळ आली आहे, अशा शब्दांत आमदार राणे यांनी आपला संताप व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समितीने मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण या सरकारने काढून घेतले आहे. या प्रश्नावर स्वाभिमानी पक्ष आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)