भाजपमध्ये गटबाजी आली उफाळून ; डॉ. विखे यांच्या उमेदवारीने संमिश्र प्रतिक्रिया

 भाजपचे तीन, सेनेचा एक आमदार जमेची बाजू

शेवगाव/ जनार्दन लांडे: भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाबाबत परिसरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यानिमित्ताने मतदारसंघातील भाजपअंतर्गत गटबाजीची उफाळून आली आहे. नगर दक्षिणमध्ये भाजपचे तीन आमदार, तर मित्रपक्ष शिवसेनेचे एक आमदार आहेत, ही डॉ. विखे यांच्या उमेदवारीसाठी जमेची बाजू आहे.

डॉ. विखे यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी विविध मतदारसंघांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच वेळी डॉ. विखे यांच्या प्रवेशास विरोध करण्यासाठी शेवगावचे नगरसेवक कमलेश गांधी, बाळासाहेब कोळगे, अशोक खिळे, राम पोटफोडे, आश्रू टकले, विक्रम बारवकर, मिलिंद भालसिंग, बाळासाहेब पोटघन, अजय बोरा, निखील मंडलेचा, कुंतिलाल चोरडिया यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच डॉ. विखे यांचा पक्षप्रवेश झाल्यावर त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते वाय. डी. कोल्हे, सरपंच गुरुनाथ माळवदे, नगरसेवक अरुण मुंडे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, बापू पाटेकर, माणिकराव खेडकर आघाडीवर होते. पाथर्डीत तर कॉंग्रेसमधीलच कार्यकर्त्यांनी विखे भाजपवासी झाल्यावर बरे झाले…. गेली, अशा उपरोधिक शब्दांत फटाके वाजवून जल्लोष केला.

डॉ. विखे यांचा पक्षप्रवेश झाला असला, तरी उमेदवारीचा निर्णय दिल्लीत हायकमांड घेणार आहेत. त्यामुळे गांधी यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते असून, त्यांनी त्याबद्दल कुठेही आक्रस्तळेपणा केलेला नाही. खा. गांधींना नुकताच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. डॉ. विखे यांची उमेदवारी म्हणजे हाच पुरस्कार गांधींना नारळ ठरू शकतो. खा. गांधींवर उमेदवारीबाबत गुदरलेली ही दुसरी वेळ आहे. 2004 मध्ये ना. स. फरांदे यांच्यासाठी त्यांना उमेदवारी सोडावी लागली होती. प्रत्यक्ष उमेदवारीसाठी अवधी असल्याने येथील काही ज्येष्ठ कार्यकर्ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

भाजपामध्ये काहीही घडू शकते हा त्यांचा दावा आहे. पुष्टीसाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा दाखला देण्यात आला. पक्ष प्रवेशाच्या वेळी त्यांचे जंगी स्वागतही झाले. मात्र पुढे काय झाले हे सांगायला नको. शेवगाव विधानसभेची जाहीर केलेली उमेदवारीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही घंटे असताना बदलली गेली होती, या कडेही ही मंडळी आवर्जून लक्ष वेधते आहे. विखे यांचा प्रवेश झाला असला, तरी आजही त्यांच्या पूर्वीच्या भाषणातील खासदार गांधी, मंत्री राम शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि भाजपावरील टीकेच्या सोशल मीडियातील क्‍लिपा आजही व्हायरल होत आहेत.

शेवगाव मतदारसंघात कॉंग्रेस पक्ष तसा औषधालाही नाही. नाही म्हणायला एक तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव अशी तीन नावे आहेत. तीही निवेदना पुरती. राष्ट्रवादीने नगर दक्षिण मतदारसंघ डॉ. विखेंसाठी कॉंग्रेसला सोडला असता तर त्यांना मंचावर स्थान मिळाले असते. अन्‌ डॉ. विखेंनी घड्याळ बांधले असते, तर मात्र चित्र बदललेले असते. राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, चंद्रशेखर घुले या घुले बंधूंचे सहकार्य झाले असते. पण विखे यांना भरघोस मताधिक्‍य देऊ शकेल, असा स्वतःचा हक्काचा एकही मतदारसंघ नाही. त्यामुळे डॉ. विखेंना आता सर्वप्रथम येथील भाजप अंतर्गत गटबाजी मोडून काढावी लागेल.

जुन्या निष्ठावंत व नवीन यांचा मेळ घालून कामास लागावे लागेल. हे करताना भाजपच्या तीन, तर मित्रपक्ष शिवसेनेच्या एका आमदारास अन्य पदाधिकाऱ्यांना जवळ करावे लागेल. विखेंची स्वतंत्र यंत्रणा राबवताना भाजपची मुळची यंत्रणा दुखावणार नाहीना, याबाबत सतर्क राहावे लागेल. प्रवेश प्रक्रियेत डावलण्यात आलेल्या ना. पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. या मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा मतदार आहे. त्यांना डावलणे महागात पडू शकते.

पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी या परिसरात सुरू केलेले वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व त्यांच्या दिवंगत व्याही माधव नरवडे पाटील यांच्या मोठ्या गोतावळ्याचा फायदा होणार आहे. विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आमदार अरुणकाका जगताप यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे ही लढत मात्र अत्यंत चुरशीची होऊ शकते. आमदार जगताप हे जुने जाणते नेतृत्व असून, त्यांचे नगर शहरासह तालुक्‍यात, श्रीगोंद्यात, पारनेर, जामखेडमध्ये चांगले वर्चस्व आहे. पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष मामा घोडके यांच्या सहकाऱ्यांचे व शेवगावात घुले बंधूंचे सहकार्य त्यांना मिळू शकते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)