भाजप – शिवसेनेतच ताणाताणी

जालना लोकसभा मतदारसंघ

जालना या लोकसभा मतदारसंघात जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी 3 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये 101-जालना, 102-बदनापूर (अ.जा.), 103-भोकरदन, 104-सिल्लोड, 106-फुलंब्री आणि 110-पैठण या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून सहा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र मिळून या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आहे. जालना तालुक्‍यातील वाघरुळ, जहांगीर, रामनगर व जालना या तीन महसूल मंडलांशिवाय जालना नगरपालिकेचा समावेश आहे. बदनापूर, जाफ्राबाद, सिल्लोड, फुलंब्री, पैठण या तालुक्‍यांचा समावेश या मतदारसंघात होतो. तसेच औरंगाबाद तालुक्‍यातील पिंपरी, लाडसांगवी, करमाड, चौक तसेच सोयागाव भोकरदन तालुक्‍यातील धावडा, पिंपळगाव, शिकोरा बाजार व भोकरदन महसूल मंडळासह जालना नगरपालिका, भोकरदन नगरपालिका, अंबड नगरपालिकांचा समावेश या मतदारसंघात होतो.

कॉंग्रेस पक्षाकडे पूर्वीपासून असलेल्या जालना मतदारसंघात 1977 चा अपवाद वगळता कॉंग्रेसने वर्चस्व प्राप्त केले होते. मात्र 1989 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तांतर होऊन भारतीय जनता पक्षाने सत्ता हस्तगत केली ती आजपर्यंत राखून ठेवण्यात यश मिळविले आहे.

जालना या लोकसभा मतदारसंघात मराठा, मारवाडी या समाजाशिवाय अनुसूचित जाती-जमातीतील घटक जातींचा प्रभाव आहे. याबरोबरच त्या तुलनेत ओबीसी मधील माळी, साळी या समाजाचा देखील राजकीयदृष्ट्या प्रभाव असून या मतदारसंघात प्रामुख्याने मराठा समाजाचे राजकीयदृष्ट्या प्राबल्य आहे. जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील संघर्षच सध्या गाजतो आहे. अर्थात अर्जुन खोतकर यांचा थयथयाटच जास्त आहे हे वेगळे सांगायला नको. ही जागा भाजपच लढवणार हे आता जवळजवळ निश्‍चित झाले आहे. तेव्हा खोतकरांना माघार घेणे भाग आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे वेगळे आहे असे सांगत त्यांचा आक्रस्ताळेपणा सुरूच आहे. जालन्यातील कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांचीही भेट त्यांनी घेतले. हे सगळे त्यांचे दबावतंत्र आहे, हे वेगळे सांगायला नको.

आता वरिष्ठांनी युती केली आहे, त्यामुळे त्यांचा आदेश आम्ही मानणार भाजपचा प्रचारही करणार, पण सामान्य शिवसैनिकांचे म्हणणे वेगळे आहे याची दखलही वरिष्ठांना घ्यावी लागेल, असे आता खोतकर म्हणत आहेत. वास्तविक पाहता भाजप-शिवसेना युतीत आतापर्यंत शिवसेना थोरल्या भावाच्या भूमिकेत होता. बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व जोपर्यंत होते, तोपर्यंत ते योग्यही होते. पण नंतरच्या काळात भाजपचीही ताकद वाढली, याचे भान शिवसेनेने ठेवले नाही. त्यामुळेच सरकारमध्ये असूनही विरोधी पक्षासारखे वर्तन या पक्षाने केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत तर शिवसेनेने विरोधी पक्षांशी युती करून सत्ता मिळवली. अर्थात भाजपचाही त्याला अपवाद नाही. पण आता लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली तेव्हा स्थानिक पातळीेंवर कार्यकर्ते आणि नेते यांची गोची झाली आहे. जालन्यातील खोतकरांचा थयथयाट हा त्यातलाच प्रकार आहे.

युतीत आल्यानंतर युतीचा धर्म दोन्ही बाजूंनी पाळायचा असतो याची जाणीव दोन्ही पक्षांनी ठेवायची गरज असते. कार्यकर्त्यांची ढाल पुढे करून शिवसेनेचे नेते आक्रस्ताळेपणा करत असतात तर कधी भाजपचे नेते चडफडत असतात. यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण होतो याचे भान या दोघांनाही नाही. रावसाहेब दानवे जालन्यातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळीही ही जागा आपणच जिंकू असा विश्‍वास त्यांना आहे. त्यांना विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या आव्हानाचा फारसा त्रास नाही. पण शिवसेनेने सहकार्य केले नाही तर काय हा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. खोतकर आणि दानवे यांच्यात शिवसेनेचे नेते सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली. पण काही उपयोग झाला नाही. पण निवडणुकीचे राजकारण पुढील काळात आणखी रंगतदार होईल अशीच चिन्हे दिसत आहेत.

कॉंग्रेसच्या आघाडीवर सामसूम आहे. या मतदारसंघातून भीमराव डोंगरे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी जालन्यातील कॉंग्रेस नेत्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. दानवे यांना खरे तर आमदार कल्याण काळे टक्कर देतील अशी अपेक्षा होती. पण काळे यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आणि म्हणून मग भीमराव डोंगरे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

रावसाहेब दानवे राजकारणात पुरते मुरलेले आणि अतिशय अनुभवी नेते आहेत. खोतकरांच्या तुलनेत या मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क आणि प्रभाव मोठा आहे. पण खोतकर काही ऐकायला तयार नाहीत. दानवे यांनी शिवसैनिकांना कसा त्रास दिला, खोट्या गुन्ह्यांत कसे अडकवले, हे सगळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. खोतकर ऐकत नाहीत म्हटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची भेट घेतली, तरीही खोतकरांनी आपला हेका सोडलेला नाही. आता दानवे यांच्याशी बोलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी खोतकरांना सांगितले आहे.

गेल्या पाच वर्षांत भाजप आणि शिवसेनेत जे राजकारण खेळले गेले त्यामुळे नाही म्हटले तरी बऱ्याच मतदारसंघांत समस्या निर्माण झाल्या आहेत. स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांची समजूत काढण्याचेच आव्हान विरोधी पक्षांचा सामना करण्यापेक्षा भाजप आणि शिवसेनेपुढे आहे. यात समाधानाची बाब इतकीच आहे की शिवसेना किंवा भाजपतील नाराज मंडळींनी कितीही अकांडतांडव केले तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आश्रयाला फारसे कुणी जाणार नाही, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी. कारण त्या पक्षांतीलच अंतर्गत वाद इतके टोकाचे आहेत की नव्यांना या पक्षांमध्ये कोणतेच स्थान मिळत नाही. हे नारायण राणेंनी तर चांगलेच अनुभवले आहे. म्हणूनच खोतकर कितीही दबाव टाकत असले तरी त्यांची समजूत काढणे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना नक्‍की जमेल आणि दानवेंनाही त्यांचे सहकार्य लाभेल असे वाटते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)