अधिकाऱ्यांना बॅटने बदडणाऱ्या आमदार आकाश विजयवर्गीय यांना भाजपकडून ‘नोटीस’

इंदौर – भाजपचे मध्य प्रदेशातील इंदौर येथील आमदार तथा भाजपचे जेष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आकाश विजयवर्गीय यांना अखेर पक्षाकडून कारणे-दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या महिन्यामध्ये इंदौर येथे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना बॅटने हाणमार केल्या प्रकरणी आकाश विजयवर्गीय यांना ५ दिवसांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागली होती. मात्र कारागृहातून सुटका होताच मध्य प्रदेश भाजप पदाधिकाऱ्यांनी आकाश विजयवर्गीय यांचे एखाद्या ‘हिरो’ प्रमाणे जंगी स्वागत केले होते.

याप्रकरणावरून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर भूमिका घेत आपल्याला आमदार गमवावा लागला तरी कबुल परंतु  पक्षामध्ये शिस्तभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सदर कारवाई करताना तो कोणाचा मुलगा आहे हे न पाहता कारवाई केली जाईल असे ठणकावून सांगितले होते. तसेच आकाश विजयवर्गीय यांच्या, ‘पहले निवेदन, फिर आवेदन और फिर दनादन’ या भूमिकेवरही त्यांनी तीव्र आक्षेप नोंदविला होता.

पंतप्रधानांच्या या भूमिकेमुळे अखेर पक्षाने आकाश यांना त्यांनी केलेल्या कृतीबाबत कारणे-दाखवा नोटीस बजावण्याची कारवाई केली असून यानंतर पक्षातर्फे त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येते की केवळ कारणे-दाखवा नोटीस बजावण्यापर्यंतच कारवाई सीमित राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)