लखनौ: भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी आज आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशमधील बहराईच मतदारसंघाच्या त्या खासदार आहेत. भाजपा समाजात फूट पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच राम मंदिराच्या मुद्द्यावरुन फुले यांनी भाजपला घरचा आहेर दोत टीका केली होती. राम मंदिर हे मंदिर नसून देशातील 3 टक्के ब्राह्मणांच्या कमाईसाठीचा धंदा आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्याचबरोबर भगवान हनुमान हे मनुवादी लोकांचे गुलाम होते, असेही म्हटले होते. राम हे मनुवादी होते. जर हनुमान दलित नसते तर त्यांना मनुष्य का बनवण्यात आले नाही ? त्यांना वानरच का केले ? त्यांचा चेहरा काळा का केला, अशा प्रश्नांची सरबत्तीच केली होती.
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरुनही त्यांनी भाजपला घेरले होते. मी भाजपाची नव्हे तर दलिताची मुलगी आहे. आरक्षण संपवण्याचा कट रचला जात आहे. मी जर खासदार झाले नसते तर भाजपला बहराईच मतदारसंघ राखता आला नसता. भाजपला नाईलाज होता. त्यांना विजय मिळवून देणारा उमेदवार हवा होता. त्यामुळे त्यांनी मला तिकीट दिले. मी त्यांची गुलाम नाही. खासदार होऊनही जर मी माझ्या लोकांसाठी बोलू शकत नसेल तर काय फायदा, असा सवाल त्यांनी केला होता.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा