शिवसेनेचे शिरूर, मावळचे उमेदवार बदला; भाजपाचे दोन्ही आमदार आक्रमक

दोन्ही पक्षांची समन्वय बैठक अयशस्वी

पिंपरी : शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी दोन दिवसांपुर्वीच आकुर्डीत झालेली दोन्ही पक्षांची मनोमिलन बैठक अयशस्वी ठरली होती. आमदार लक्षमण जगताप आणि महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत भोसरी व चिंचवड विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांची बैठक भाजप शहर कार्यालयात सोमवारी (दि.25) पार पडली. शिवसेनेने भाजपवर केलेल्या टीकेबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा दोन्ही मतदार संघातील उमेदवार बदलावेत, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. त्यामुळे युतीपुढे पेच निर्माण झाला आहे. येत्या बुधवारी (दि.27) पुन्हा बैठक होणार असून त्यावेळी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

युतीच्या वाटपात मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत. हे मतदार संघ भाजपला देण्याची मागणी पूर्ण न झाल्याने दोन्ही आमदार कमालीचे नाराज आहेत. त्यातल्या त्यात आमदार लक्षमण जगताप यांची नाराजी अधिक आहे. भाजप शहर कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला दोन्ही मतदार संघातील 48 नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेच्या भाजपविरोधी भूमिकेवर चर्चा करण्यात आली. लोकसभेकरिता युती होईल का नाही, याची शक्‍यता नसल्याने शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घतेले होते. आता त्यांचेच गुणगाण कसे गायचे? असा प्रश्‍न भाजप पदाधिकाऱ्यांना पडला आहे.

समन्वय बैठकीला अनूपस्थित राहत, आपली नाराजी उघडपणडे दर्शविली होती. तर महेश लांडगे हे या शिरूरच्या समन्वय बैठकीला उपस्थित राहिले, तरी त्यांच्या समर्थकांनी मात्र आढळरावांना सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, आत झालेल्या बैठकीत शिवसेनेने दोन्ही मतदार संघांमधील उमेदवार बदलावेत अशी भूमिका उपस्थित नगरसेवक व आमदारांनी मांडली. सुमारे अर्धा तास चाललेल्या बैठकीत सर्वच उपस्थितांनी नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवारांचे काम करण्याबाबत नाराजी व्यक्‍त केली.

शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांची बैठक होणार

शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांबाबतची खदखद या बैठकीत व्यक्‍त करण्यात आली. ही नाराजी या दोन्ही उमेदवारांपर्यंत पोहोचवून, त्याबाबत त्यांचे मत जाणून घेण्यासाठी येत्या बुधवारी संयुक्‍त बैठक आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यावेळी युतीबाबत अंतिम तोडगा निघण्याची शक्‍यता आहे.

समन्वयासाठी बापटांऐवजी अन्य कोण?

दोन्ही पक्ष पदाधिकाऱ्यांसाठी समन्वयासाठी भाजपकडून पालकमंत्री गिरीष बापट तर शिवसेनेकडून डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच आकुर्डीत या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक पार पडली. मात्र, पुण्यातून भाजपकडून गिरीष बापट यांना रिंगणात उतरविण्यात आले असल्याने समन्वयासाठी त्यांना वेळ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपकडून समन्वयासाठी कोणाची नियुक्‍ती केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)