कोरेगाव तालुक्‍यात भाजपची मुसंडी

दहा पैकी पाच ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच ः कॉंग्रेस-राष्ट्रवादीची पिछेहाट
कोरेगाव –
तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली. दहा पैकी पाच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर भाजपने विजय मिळवला तर राष्ट्रवादी व कॉंग्रेसची पिछेहाट झाली. शिवसेनेला अगदी थोड्या जागा मिळवता आल्या आहेत. एकंदरीत तालुक्‍यात भाजपने आता गावपातळीवर लक्ष केंद्रीत केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपने एकसळ, भाडळे, चंचळी, सर्कलवाडी व आझादपूर येथे सरपंचपदावर विजय मिळवला असल्याचा दावा केला आहे. आर्वी ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादीने देखील आपले यश असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेनेला एकसळमध्ये दोन जागा मिळवता आल्या आहेत.

एकसळमध्ये भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनेलने सरपंचपदावर विजय मिळवला आहे. किरण भोसले हे सरपंच म्हणून निवडून आले आहेत. सदस्यांमध्ये याच पॅनेलला 3 जागांवर यश मिळाले आहे. कॉंग्रेस पुरस्कृत समृद्धी ग्रामविकास पॅनेलने 4 तर शिवसेनेच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनेलला 2 जागा मिळाल्या आहेत. उत्तर भागातील अत्यंत महत्वाची भाडळे ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत रंगतदार झाली. भाजप पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत जनजागृती पॅनेलमध्ये लढत झाली. सरपंचपदी भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे रोहीदास बापूसाहेब घोरपडे हे विजयी झाले आहेत. सदस्यपदामध्ये भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलला 4 तर जनजागृती पॅनेलला 5 जागा मिळाल्या.
चंचळीमध्ये भाजपप्रणित भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल व राष्ट्रवादीच्या भैरवनाथ विकास पॅनेलमध्ये थेट लढत झाली. सरपंचपदी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे प्रभाकर गायकवाड विजयी झाले असून, सदस्यपदामध्ये भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला 6 तर भैरवनाथ विकास पॅनेलला 3 जागा मिळाल्या आहेत.

आझादपूरमध्ये भाजपप्रणित जयभवानी पॅनेलने विजयश्री खेचून आणत राष्ट्रवादी पुरस्कृत वेताळ पॅनेलचा पराभव केला आहे. सरपंचपदी भाजपचे विनोद शामराव कर्पे विजयी झाले आहेत. सदस्यांमध्ये 5 जागांवर भाजपने यश मिळवले असून, दोन जागा रिक्त राहिल्या आहेत. सर्कलवाडीमध्ये भाजपप्रणित जनक्रांती विकास पॅनेलने सत्तांतर घडवले असून, राष्ट्रवादीपुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलचा धुव्वा उडवला आहे. सरपंचपदी भाजपचे संतोष सर्जेराव महांगडे विजयी झाले आहेत. सदस्यपदामध्ये सर्वच्या सर्व 7 जागांवर विजय मिळवला आहे. आर्वीमध्ये कॉंग्रेस पुरस्कृत स्वयंभू ग्रामविकास पॅनेल व राष्ट्रवादी पुरस्कृत जोर्तिलिंग विकास पॅनेलमध्ये लढत झाली. सरपंचदपदी स्वयंभू ग्रामविकास पॅनेलच्या सविता विकास राऊत विजयी झाल्या आहेत. सदस्य पदामध्ये स्वयंभू ग्रामविकास पॅनेलला 9 जागा तर जोर्तिलिंग विकास पॅनेलला 4 जागा मिळाल्या आहेत. पळशीमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत सुळकेश्‍वर पॅनेल व भाजपप्रणित ग्रामविकास पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. सरपंचपदी सुळकेश्‍वर पॅनेलचे बादशहा बुऱ्हाण इनामदार हे विजयी झाले आहेत. सदस्यपदामध्ये सुळकेश्‍वर पॅनेलला 5 तर ग्रामविकास पॅनेलला 4 जागांवर विजय मिळवता आला आहे.

बोरगावमध्ये माजी खासदार लक्ष्मराव पाटील गटाचे बाळसिध्द परिवर्तन पॅनेल, शेतकरी पॅनेल व शिवशंभो पॅनेलमध्ये लढत झाली. सरपंचपदी बाळसिध्द परिवर्तन पॅनेलच्या रुपाली संजय घाडगे या विजयी झाल्या आहेत. सदस्यपदामध्ये बाळसिध्द परिवर्तन पॅनेलला 6 तर शेतकरी पॅनेलला 3 जागा मिळाल्या. टकले येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास पॅनेल व राष्ट्रवादीच्या जय बजरंगबली पॅनेलमध्ये लढत झाली. सरपंचपदी जय हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या प्रमुख मनिषा प्रशांत घाडगे या विजयी झाल्या आहेत. सदस्यपदामध्ये जयहनुमान पॅनेलला 4 तर जय बजरंगबली पॅनेलला 3 जागा मिळाल्या. जायगावमध्ये सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध झाली होती. केवळ सरपंचपदासाठी मतदान झाले. कोणत्याही पक्षाचे नाव घेता, स्थानिक पातळीवर ही निवडणूक झाली. सरपंचपदी सुभाष महादेव कदम हे विजयी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)