भाजप नगरसेवकांना ट्रस्टच्या टॅक्सची काळजी

उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचा आरोप; सर्वसामान्यांच्या माहितीसाठी खुलासा केल्याचे नमूद

कराड – 
मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकी दरम्यान कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे संकलित थकीत कराबाबत जाहिर खुलासा करण्याबाबत डॉ. अतुल भोसले यांना विनंती केली होती. परंतू याबाबतचा त्यांच्याकडून खुलासा करण्यात आलेला नाही. मलकापूर नगरपरिषद निवडणूक 2019 च्या सांगता सभेमध्ये जी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टबाबत थकबाकीचा आकडा जाहिर केला होता. नगरपरिषदेचे दि. 28 फेब्रुवारी रोजी विशेष सभेमध्ये भाजप नगरसेवकांनी बजेटमध्ये दर्शविलेल्या 2.86 कोटी थकबाकीबाबत विचारणा केली होती. यावरुन त्यांना 2.86 कोटी थकबाकीची रक्कम मान्य असलेचे सिद्ध होत आहे. इथेच माझे 50 टक्के काम त्यांनी पूर्ण केले आहे.

वास्तविक पाहता त्यांनी सभागृहामध्ये नागरिकांच्या प्रश्‍नाबाबत विचारणा करणे अपेक्षित आहे. परंतू तसे न करता त्यांनी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या म्हणजेच धनदांडग्यांच्या कराचा मुद्द उपस्थित करुन त्यांची प्राथमिकता काय आहे, हे सर्वसामान्य जनतेला कळून आले. त्यामुळे भाजपचे नगरसेवक नेमके कुणाचे हित पाहत आहेत हे नागरिकांना माहिती झाले असल्याचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मलकापूर व परिसरातील सर्व नागरिकांना माहित आहे की, कृष्णा कारखाना व सर्व सामान्यांच्या पैशातून कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टची उभारणी झाली आहे. याबाबत यापूर्वी कारखान्याच्या निवडणुकांमध्ये कारखान्याच्या आजी-माजी चेअरमनांनी याबाबत आरोप-प्रत्यारोप केले आहेत. तसेच जे आज कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे कराबाबत जाहिरपणे पाठराखण करत आहेत. त्यांनीच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टची थकबाकी का वसूल करत नाही? अशी विचारणा जाहिरपणे केलेली होती.

आज त्यांना कराबाबत एवढा पुळका येणेची गरज काय? वास्तविक पाहता कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे संकलित कर वसुलीबाबत न्यायालयीन दावा सुरु असल्यामुळे याबाबत जाहिररित्या खुलासा करणे उचित होणार नाही. परंतू ज्या वेळी या विषयाबाबत समक्ष चर्चा होईल. त्या वेळेला सविस्तर माहिती जनतेसमोर आणता येईल. मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा नीलम येडगे यांच्याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विरोधक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे खेदजनक आहे. मलकापूर नगरपरिषदेचे कामकाज अध्यक्षा व उपाध्यक्ष यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम, 1965 चे कलम 59 (1क) नुसार दिलेल्या कर्तव्याप्रमाणे कामकाज चालविले जात आहे. याबाबत सभागृहात बोलणे उचित होईल. हा खुलासा केवळ मलकापूर मधील सामान्य नागरीकांसाठी करत असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

अधिकारपत्र पालिकेकडे दाखल करावे

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे कोणतेही पदाधिकारी अथवा अधिकारी ट्रस्टचा टॅक्‍स या मुद्यावर काही बोलत नाहीत. परंतू भाजप नगरसेवकांनाच त्याची काळजी पडली आहे. त्यांनी थकीत कराच्या आकड्यांबाबत बोलताना कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व ट्रस्टी यांचे अधिकार पत्र घेऊन ते नगरपरिषदेकडे दाखल करावे व तद्‌नंतरच चर्चेला यावे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)