भाजपचा फक्‍त लुटीचा अजेंडा

विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस गटनेत्यांचा आरोप 

अधिकाऱ्यांचा पदभार काढण्यावरून टीकेची झोड

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – “भ्रष्टाचाराला थारा न देणाऱ्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा पदभार काढून त्यांना अपमानित करणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा केवळ पुणे शहराला लुटण्याचा अजेंडा आहे. महिला अधिकाऱ्यांच्या रुपाने समस्त महिलावर्गाबद्दल भाजपची निती यामुळे स्पष्ट दिसत असून, आम्ही त्याचा निषेध करतो. तसेच उगले यांच्याकडे पूर्वी असलेल्या विभागांचा पदभार त्वरित सोपवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने शुक्रवारी दिला.

विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही टीका केली. ते म्हणाले, “मागील काही दिवसांपासून अतिरिक्त आयुक्त उगले यांच्या विरोधात भाजपने मोहीम सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचे प्रस्ताव, निविदा प्रक्रियेत होणाऱ्या “रिंग’ला विरोध, तसेच एस्टीमेट कमिटीमध्ये जास्त किंमतीचे येणाऱ्या निविदांकडे बारकाईने लक्ष देत उगले यांनी महापालिकेचे पर्यायाने पुणेकरांचे हित जपले आहे,’ असे तुपे आणि शिंदे यांचे म्हणणे आहे.

मात्र, यामुळे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सैरभैर झाले असून, उगले यांच्याकडील पदभार हटवावेत, अन्यथा त्यांची बदली करावी यासाठी थेट स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवण्यात आली. मुख्यसभेतही उगलेंवर थेट आरोप करण्यात आले. नुकतेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठक घेऊन थेट उगले यांच्याकडील काही विभागांचा पदभार काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले. राव यांनी या आदेशाची अंमलबजावणी करत गुरूवारी उगले यांच्याकडील काही विभागांचे पदभार काढून अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे दिले.

“उगले यांचे पती बसवराज तेली हे पुण्यातील मध्यवर्ती भागात पोलीस उपायुक्त होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांची वर्धा येथे बदली झाली आहे. त्यांची बदली झाल्यानंतर तातडीने उगले यांच्याकडील काही विभागांचे पदभार काढले. याचाच अर्थ सत्ताधारी हे प्रशासकीय यंत्रणेला आपल्या फायद्यासाठी वापरत असल्याचे निष्पन्न होत आहे,’ असा आरोपही तुपे आणि शिंदे यांनी केला.

“अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी “प्री-बिड’ न घेता घनकचरा विभागाच्या निविदेला मान्यता देत चुकीची कार्यपद्धती वापरली. त्याच निंबाळकर यांच्याकडे उगले यांच्याकडील महत्त्वाच्या विभागांचा पदभार सोपवून भाजपने त्यांची भ्रष्टाचारी कामकाजाची दिशा स्पष्ट केली. यापूर्वीही पारदर्शकपणे काम करणाऱ्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची तडकाफडकी बदली केली गेली. त्यामुळे भाजपचा पारदर्शकतेचा बुरखा फाटला असून, महिलांविषयीची भाजपची भूमिका किती दुय्यम आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी लक्ष घालून उगले यांच्याकडे त्यांचे पूर्वीचे पदभार पुन्हा सोपवावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार,’ असेही तुपे आणि शिंदे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)