पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर कोट्यवधींचा खर्च

48 परदेश दौऱ्यांसाठी 2021 कोटी रुपये खर्ची

नवी दिल्ली: सत्तेत आल्यापासून मोदींचे परदेश दौरे हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेले आहेत. दरम्यान, या दौ-यांवर तब्बल 2021 कोटी रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयानेच दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेस खासदार संजय सिंह यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी ही माहिती दिली. चार्टर्ड विमान प्रवास भाडे, विमानाचा देखभाल खर्च आणि हॉटलाईन फोन सुविधा या तीन बाबींअंतर्गतचा खर्च यात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यातही हॉटलाईन फोनच्या बिलाचे आकडे हे दोन वर्ष आधीचे आहेत.

मोदींच्या तुलनेत मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात मात्र परदेश दौऱ्यांसाठी सरकारी तिजोरीवर कमी भार पडल्याचे चित्र दिसते. सत्तेत आल्यापासून आतापर्यंत मोदींनी 48 परदेश दौऱ्यांमधे 55 देशांना भेटी दिल्या, तर 2009 ते 2014 या यूपीए 2 च्या काळात मनमोहन सिंह यांनी 38 परदेश दौऱ्यांमधे 33 देशांना भेटी दिल्या होत्या.

मोदींच्या परदेश दौऱ्यांचा खर्च 2021 कोटींहून अधिक आहे. तर मनमोहन सिंह यांच्या काळात हा खर्च 1346 कोटी रुपये होता. म्हणजे मोदींच्या कार्यकाळात परदेश दौऱ्यांवर झालेला खर्च मागच्या सरकारच्या तुलनेत 800 कोटींनी अधिक आहे.

ज्या ज्या देशांना मोदींनी भेटी दिल्यात, तिथून भारतात नेमकी किती गुंतवणूक आली हे या खासदारांना जाणून घ्यायचे होते. अर्थात पंतप्रधानांची भेट आणि आलेली गुंतवणूक यांचा थेट संबंध काढणे योग्य नसून त्यात इतरही घटक कारणीभूत असतात. 2014 नंतर ज्या देशांना मोदींनी भेट दिली, त्यातल्या अनेक देशांतून सर्वाधिक परकीय गुंतवणूक आल्याचे सरकारने या उत्तरात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)