#दृष्टिक्षेप : बिहारमधील कळ्यांचे निःश्वास

हेमंत देसाई

बालविवाह व हुंडा प्रथेविरुद्धही नितीशकुमार आवाज उठवत असतात. मात्र एवढे सर्व असले, तरी त्यांचे प्रशासन अकार्यक्षम असून, अनागोंदी बरीच आहे. शिवाय राजकीय हितसंबध असल्यामुळेच ब्रजेश ठाकूरला उत्तेजन व संरक्षण मिळत गेले. अशा अधम प्रवृत्तींविरुद्ध नितीशकुमार हल्लाबोल करणार का, हा खरा सवाल आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ म्हणणाऱ्या भाजपच्या नेतृत्वालाही यासंबंधीच्या सवालांना उत्तरे द्यावी लागतील.

गेल्या महिन्यात बिहारमधील मुझफ्फरपूर येथे एका सात वर्षांच्या मुक्‍या व बहिऱ्या मुलीने आपल्या शरीरावरील जखमा दाखवत, आपल्यावरील अत्याचाराची कहाणी दंडाधिकाऱ्यांपुढे सांगितली. अर्थातच खाणाखुणा करून. तिच्याबरोबर राहणाऱ्या दुसऱ्या बालिकेने न्यायमूर्तींना तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली. बिहारमधील या अनाथ बालिकागृहातील 35 पेक्षा जास्त मुलींवर अत्याचार झाल्याची भयंकर कहाणी समोर आल्यामुळे, केवळ बिहारमध्येच नव्हे, तर देशभऱ खळबळ माजली आहे. त्यानंतर आसाम व उत्तर प्रदेशातही अशाच प्रकारच्या घटना घडल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. अर्थात भारतातील प्रथेप्रमाणे या दुर्दैवी घटनेचेही राजकारण सुरू झाले आहे. हे अनाथालय पाच मजली असून, तेथे 6 ते 18 वर्षे वयाच्या 46 मुली राहत आहेत. तेथील दोन खोल्यांमध्ये दररोज रात्री पुरुष येतात आणि तेथील एका महिला सहायकाच्या मदतीने त्या मुलींपर्यंत पोहोचतात व त्यांचे शोषण करतात, असे दिसून आले आहे. अनेकदा तेथून बालिकांच्या किंकाळ्या व विव्हळणे ऐकू येत असल्याचे शेजारी सांगतात. यामागचा सूत्रधार ‘प्रातःकमल’ या वृत्तपत्राचा मालक ब्रजेश ठाकूर असून, तोच हे अनाथालय चालवतो. त्याच्या वृत्तपत्राचा खप केवळ 300 असून, तरीदेखील त्याला दरवर्षाला 30 लाख रुपयांच्या जाहिराती मिळतात. याचा अर्थ, सरकारमध्ये त्याचे चांगलेच वजन आहे, असे दिसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेनंतर बिहार समाजकल्याण विभागाने राज्यातील जिल्हा बालसंरक्षण केंद्रांच्या 14 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. वास्तविक ‘टीआयएसएस’च्या सोशल ऑडिट रिपोर्टने अनाथालयातील वास्तव अगोदरच सरकारसमोर आणले असतानाही, कोणतीही कारवाई झाली नव्हती. याच कारणावरून त्यांचे निलंबन झाले आहे. मुझफ्फरपूरकांडाचा निषेध करण्यासाठी नवी दिल्लीमधील जंतरमंतर रोड येथे राष्ट्रीय जनता दलाने एक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तसेच नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हजर होते. या सभेला हजर राहू नका, असे आवाहन जनता दल युनायटेडचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कॉंग्रेसला केले होते. त्यांचे आणि भाजपचे मिळून बिहारमध्ये संयुक्त सरकार आहे. परंतु अलीकडे त्यांचे पुन्हा बिनसले आहे. विविध प्रश्नांवरून आणि खास करून बिहारच्या पॅकेजवरून नितीशकुमार यांनी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली होती. लोकसभेला अधिक जागा मिळाव्यात; तरच भाजपशी आघाडी करू, अशी त्यांची अट असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीच्या वेळी, नितीशकुमार हेच आघाडीचे नेते म्हणून प्रोजेक्‍ट केले जातील आणि जदयूला जास्त जागा देऊ, असे आश्वासन मिळाल्यानंतर ते शांत बसले. परंतु त्यानंतर पुन्हा कुरबुरी सुरू झाल्या आहेत. नितीशकुमार यांनी राजदबरोबरचे आपले सरकार विश्वासघात करून स्वतःच पाडले आणि भाजपसमवेत सरकार बनवले. तेव्हा अशा ‘धोकेबाज चाचा’ला आम्ही आता आमच्याबरोबर कधीही घेणार नाही, असे राजदचे तरुण नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. त्यांनी तर थेट, नितीशकुमार यांनी बालिकांवरील सामूहिक अत्याचारप्रकरणी राजीनामा द्यावा, अशीच मागणी केली आहे.

भाजपविरोधी आघाडीत नीतीशकुमार यांनीही यावे, अशी राहुलजींची इच्छा असल्याचे बोलले जात होते. परंतु जदयूपेक्षा राजदची ताकद अधिक आहे. जदयूला कधीही माफ करणार नाही, असे राजदने स्पष्ट केल्यामुळे राहुलजींनी दिल्लीत नितीशविरोधी सभेला हजेरी लावली. या सभेत बोलताना केजरीवाल म्हणाले की, एका निर्भयाकांडामुळे जर संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार लोकांनी निवडणुकीत खाली खेचले, तर बिहारमधील पीडित 40 मुली 40 सरकारे कोसळू शकतात. मात्र या सभेस राहुलजी हजर होते आणि तेही नितीशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.

राजीनाम्याची मागणी केली, म्हणून नितीशकुमार पदत्याग करणार नाहीत. शिवाय त्यांच्या राजीनाम्यामुळे लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सुटणारही नाही. तरी याप्रकारची भंपक मागणी करणे, हे शुद्ध राजकारण आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमुळे देशातील आजपर्यंतच्या 70 वर्षांतील प्रत्येक पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला असता. तेव्हा केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्याकडून अधिक जबाबदारीच्या वर्तनाची अपेक्षा आहे. ज्या ब्रजेश ठाकूरमार्फत ‘सेवासंकल्प एवं विकास समिती’ ही स्वयंसेवी संस्था चालवली जाते, तीच बोगस दिसते. पाच अनाथालये चालवण्यासाठी तिला केंद्र व राज्य सरकारकडून दरवर्षी एकेक कोटीचे अनुदान मिळतेच कसे? कारण बिहारमधील समाजकल्याण विभागाने 2013 सालीच तिच्या व्यवहारांबद्दल प्रतिकूल अहवाल दिला होता. मुळात बिहार अजूनही मागास असून, तेथील सरंजामशाही मानसिकता गेलेली नाही. त्यामुळे स्त्री-पुरुष विषमता तीव्र आहे. मात्र नितीशकुमार यांनी महिलांच्या शिक्षणावर भर दिला आणि निवडणुकांमधील त्यांचा सहभागही वाढवला. 2005 ते 10 या कालावधीत मुख्यमंत्री असताना, नितीशकुमार यंनी महिला मतदारांना काही प्रोत्साहने दिली. ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत स्त्रियांसाठी 50 टक्के जागा राखून ठेवल्या. मुलींनी शाळेत जावे, यासाठी मुख्यमंत्री बालिका सायकल योजना सुरू केली. त्यांना मोफत गणवेश दिले. त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुलींची पटसंख्या वाढली. नितीशकुमार यांच्या पक्षास महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. त्यावेळी त्यांनी राज्यात दारूबंदी आणण्याचे वचन दिले व ते पाळलेही. ही दारूबंदी विशेष यशस्वी ठरली नसली, तरी दारुडे नवरे महिलांना मारहाण करतात, त्यांचा छळ करतात, हे वास्तव आहे. राज्य सरकारमधील 35 टक्के पदे त्यांनी स्त्रियांसाठी राखीव ठेवली आहेत. बालविवाह व हुंडा प्रथेविरुद्धही नितीशकुमार आवाज उठवत असतात. मात्र एवढे सर्व असले, तरी त्यांचे प्रशासन अकार्यक्षम असून, अनागोंदी बरीच आहे. शिवाय राजकीय हितसंबध असल्यामुळेच ब्रजेश ठाकूरला उत्तेजन व संरक्षण मिळत गेले. अशा अधम प्रवृत्तींविरुद्ध नितीशकुमार हल्लाबोल करणार का, हा खरा सवाल आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ म्हणणाऱ्या भाजपच्या नेतृत्वालाही यासंबंधीच्या सवालांना उत्तरे द्यावी लागतील.

आपल्याकडे अनेक राज्यांत स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण मोठे आहे. हजारो मुली पाच वर्षांच्या होईपर्यंत कुपोषणा अभावी मरतात. देशातच नाही, तर महाराष्ट्रातही बालविवाहांचे प्रमाण प्रचंड आहे. मात्र लहान मुलामुलींवर लैंगिक अत्याचार होणे हे हे देश म्हणून आपल्याला लाजिरवाणे आहे. आरोपींना फासावर चढवू, अशा गर्जना करून उपयोगाचे नाही. बालकांचे आणि विशेषतः बालिकांचे 100 टक्के संरक्षण करण्यात आपण अपयश ठरलो, तर एक देश म्हणून आपण नालायकच ठरू.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)