पुणे-मुंबई मार्गावर सोमवारपासून 80 ते 120 रुपयांची भाडेकपात
पुणे – पुणे ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या “शिवनेरी’, “अश्वमेध’ बसेसच्या तिकीट दरात 80 ते 120 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे दर दि. 8 जुलैपासून लागू होणार आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.
संपूर्ण राज्यामध्ये सात मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरामध्ये 435 फेऱ्या होतात. यातून दरमहा सुमारे दीड लाख जण प्रवास करतात. मागील 15 वर्षांपासून पुणे ते मुंबई मार्गावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) “शिवनेरी’, “अश्वमेध’ या वातानुकूलित वसेस धावतात. मात्र, या त्यांचे तिकीटदर 500 रुपयांवर असल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी याकडे पाठ फिरविली.
टॅक्सीसेवेमुळे भाडेकपात
पुणे ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या कमी दरात टॅक्सी सेवा सहज उपलब्ध होते. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला आहे. आता मात्र तिकीट दर कमी केल्याने प्रवासी वर्ग “अश्वमेध’ आणि “शिवनेरी’कडे वळेल, अशी आशा महामंडळाने व्यक्त केली आहे.